दीपक मोहिते,
” सत्तेचा मार्ग स्वार्थातून जातो,”आणखी एक घराणे स्वार्थापोटी दुभंगले,
सत्ता,हे सुख व ऐश्वर्य भोगण्याचे साधन आहे,त्यामुळे राज्यातील अनेक नामवंत घराणी गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत.त्यामध्ये ठाकरे,मुंडे,पवार,गांधी,
राणे,विजय सिंह मोहिते पाटील,वसंत दादा पाटील व इतर अनेक घराणीचा त्यामध्ये समावेश आहे.पण या सर्व घराणींना आता फुटीचे ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे.सत्तेचा हव्यास व स्वार्थापोटी ही सर्व घराणी आता दुभंगत चालली आहेत.ही घराणी फुटल्यानंतर त्यांना फायदा होत नाही,पण वर्षानुवर्षे हाती असलेली सत्ता गमावण्याची नामुष्की मात्र त्यांच्यावर आली.राज्याच्या सत्तेच्या राजकारणात अशी एक ना अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.पण त्यातून कोणी शहाणा व्हायला तयार नाही.या घराण्यातील प्रत्येकाला ” मला का नाही,” एकाच प्रश्नाने घेरले आहे.आजच्या घडीला या प्रश्नाचे उत्तर कोणीच द्यायला तयार नाही.पक्ष रसातळाला गेला तरी बेहत्तर,पण ” तुला मिळणार नाही,” यावर काही कुटुंबे आजही ठाम आहेत.त्यामुळे अनेक राजकीय पक्ष हळूहळू काळाच्या पडद्याआड गेले.
रायगड जिल्ह्यात एकेकाळी दबदबा असलेला शेकापही आता त्याच मार्गावर आहे.शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार पंडित पाटील व भाचे ऍड.आस्वाद पाटील हे दोघेही लवकरच भाजपवासी होत आहेत.गेल्या काही वर्षात शेकापला राज्याच्या राजकारणात उतरती कळा लागली असताना हा फार मोठा फटका असल्याचे मानले जात आहे.यापूर्वी या पक्षाने अनेक धक्के पचवले आहेत,पण हा धक्का पक्षासाठी फार मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.पंडित पाटील यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यामुळे ते नाराज होते.अशा नाराजाना आपल्या गळाला लावण्यात भाजप हा तरबेज असा पक्ष आहे.त्यांनी वेगाने हालचाल करत या दोघांना आपल्या ताब्यात घेतले आहे.या पक्षाच्या पंढरपूर येथे झालेल्या अधिवेशनात अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले होते.त्याचवेळी कुटुंब फुटीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाले होते.शेकापमधील या अंतर्गत घडामोडीचा फटका शिंदे व अजित पवार या दोन्ही गटांनाही बसण्याची शक्यता आहे.भाजप या पंडित पाटील व आस्वाद पाटील या दोघांना हाताशी धरून रायगड जिल्ह्यात आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करेल.

