दीपक मोहिते,
भयानक परिस्थिती,
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वसईची चारही शहरे बकाल,
वसई-विरार उपप्रदेशात अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नाने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे.यावर नियंत्रण आणण्याकामी वसई-विरार शहर महानगरपालिका सपशेल अपयशी ठरली आहे.नालासोपारा रेल्वे स्थानक व तूळींज पोलीस ठाणे परिसराला अनधिकृत फेरीवाल्यानी वेढा घातला असून त्यांना हटवण्यासंदर्भात पोलीस यंत्रणा देखील हतबल झाली आहे.हे सर्व अनधिकृत फेरीवाले परप्रांतीय असून त्यांना एका परप्रांतीय कुटुंबाचे संरक्षण आहे.या शहराच्या पूर्व भागातील तूळींज,आचोळे या दोन परिसरात करदात्यांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे.पदपथावर आक्रमण करणारे पोलीस,मनपा अधिकारी व माजी नगरसेवक व नगरसेविका यांना दरमहा ठराविक रक्कम देत असतात,त्यामुळे या ज्वलंत समस्येची आजवर उकल होऊ शकली नाही.हप्ते वसुली वरून शहराच्या दोन माजी नगरसेविकामध्ये जोरदार फ्रिस्टाईल हाणामारी झाली होती.त्यावरून हे अर्थकारण किती भव्य दिव्य असेल,याची आपल्याला कल्पना करता येईल.

वसई विरार शहर महानगरपालिकेचे बाजार कर ठेके कोण घेतो ? हे सर्वश्रुत आहेत.प्रत्यक्ष कागदावर इतरांची नांवे पाहायला मिळतात,पण हे ठेके,व्हाईट कॉलर नेते घेत असतात.हे नेते बेनामी पद्धतीने ठेके मिळवत असतात.अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये वाढ व्हावी,व आपल्याला त्यांच्याकडून अधिक बाजारकर उपटता यावा,यासाठी या व्हाईट कॉलर्सचे फंटर्स,या अनधिकृत फेरीवाल्यांची सोय करत असतात.ही एक मोठी इंडस्ट्री असून या बाजारकराच्या वसुलीची कुठेही कागदोपत्री नोंद नसते,हा सर्व व्यवहार रोखीत होत असतो.त्यामुळे यातील खरे गुन्हेगार सापडणे,शक्य नसते.अनेक वसुलीबाज फंटर्स तर आपल्याला नेमून दिलेल्या क्षेत्राबाहेर जाऊन वसुली करत असतात.काही आठवडे बाजारात तर महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या बाजारकरापेक्षा अधिक रकमा उकळण्यात येत असतात.अनेक ठेकेदारांचे फंटर्स बाजारकराच्या पावत्याही देत नाहीत.पण महानगरपालिका त्यावर कारवाई करत नाही,कारण अधिकारी देखील या चोरांच्या साखळीत ” साथीदार,” असतात.
आज वसई तालुक्यातील विरार,नालासोपारा,नवघर-माणिकपूर व वसई,या चार शहराना अनधिकृत फेरीवाल्यांचा जीवघेणा विळखा पडला आहे.त्यामुळे या चारही शहराला आता बकाल स्वरूप आले आहे.येथे महानगरपालिका आहे,यावर सर्वसामान्य माणसाचा विश्वासच बसत नाही,कारण परिस्थितीच तशी आहे.

