दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अन्यथा जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल….
पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नागरीकरणाला प्रचंड वेग आला असून आजच्या घडीला जिल्ह्याची लोकसंख्या तीस ते चाळीस लाखाच्या घरात पोहोचली आहे.तसेच लोकसंख्येसोबत वाहनांची संख्या वाढत चालली आहे.ही स्थिती लक्षात घेऊन वाहतूक पोलीस यंत्रणेने वाहतूकीचे नियोजनबद्ध आखणी करणे गरजेचे होते.पण तसे आजवर कधीच घडले नाही,त्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीचे पार तीन तेरा वाजले असून नागरिकांना सध्या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
नव्याने पालघर जिल्हा निर्मिती,वसई विरार शहर महानगरपालिकेचे आगमन,ग्रामीण भागात नगरपंचायतीची स्थापना,अशा विविध कारणामुळे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात नागरीकरणाला प्रचंड वेग आला आहे.गेल्या दहा वर्षात हां हां म्हणता जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे तीस ते चाळीस लाखाच्या घरात पोहोचली.जिल्हावासीय अपुऱ्या नागरी सुविधासोबत वाहतूककोंडीच्या समस्येला सध्या सामोरे जात आहेत.गेल्या दहा वर्षात जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेने या ज्वलंत प्रश्नी आजवर कधीही उपाययोजना केली नाही,त्यामुळे जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था सध्या वाऱ्यावर हेलकावे खात आहे.अनधिकृत रिक्षा व पाण्याचे अनधिकृत टँकर्स तुमच्या – आमच्या पाचवीला पुजले आहेत.काही किरकोळ अपवाद वगळता सिग्नल व्यवस्थेचा पत्ता नाही,वाहतूक पोलीस असून नसल्यासारखे कारण ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिसांचे कर्तव्यावरून गायब होणे,अनधिकृत वाहनांकडून दरमहा ठराविक हप्ता घेऊन कानाडोळा करणे,वाहतूक पोलीस स्वतः वाहतूक नियंत्रण न करता खाजगी सुरक्षा रक्षकांना तैनात करणे,अशा गैरप्रकारामुळे आज जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था रामभरोसे आहे.सध्या नागरिकांना रस्त्यावरून धड चालणे कठीण होऊन बसले आहे.सदोष सिग्नल यंत्रणेमुळे अपघातात लक्षणीय वाढ झाली आहे.या सर्व प्रश्नी जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त,जिल्हा पोलीस अधीक्षक,मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त व अन्य संबंधित विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना केली पाहिजे,अन्यथा कालांतराने जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

