दीपक मोहिते,
” सुर्यातीर,”
देवदूत दुर्लक्षित होता कामा नयेत,
कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून साफसफाईची कामे करणाऱ्या सफाई कामगारांची कहाणी अत्यंत ह्रदयद्रावक अशीच आहे.नोकरीला संरक्षण नाही,त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही,सेवानिवृत्तीनंतरचे लाभ नाहीत,वैद्यकीय सोयी-सुविधांची वानवा व क्षेत्रात शिरकाव केलेली ठेकेदारी इ.कारणामुळे आजही हा कामगार अंधारात चाचपडत आहे.
गेल्या पंच्याहत्तर वर्षात सरकारने या कामगारांचे जीवन सुसह्य व्हावे,यासाठी अनेक आयोग नेमले,पण त्यांना आजतागायत न्याय मिळू शकला नाही.आयोगाचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी हे कधी काळी दौरे करतात व सरकारी पाहुणचार घेत असतात.आज ठेकेदारीवर काम करणारे लाखो सफाई कामगार किमान वेतन,भविष्य निर्वाह निधी,उपदान निधी,वैद्यकीय लाभ इ.फायद्यापासून वंचित आहेत.त्यांच्या हितासाठी निर्माण झालेले सर्व आयोग कुचकामी ठरले आहेत.आणीबाणीच्या प्रसंगी जो घटक आपल्या मदतीसाठी धावून येतो,तो उपेक्षित जीवन जगतो,त्यास न्याय मिळाला पाहिजे,यासाठी सरकारकडून प्रयत्न होत नाहीत.आपणही याप्रश्नी संवेदनशील नाही आहोत.आजच्या घडीला देशात ५० लाख सफाई कामगार आहेत,पण त्यांचे राहणीमान,आर्थिक आवक व सुरक्षितता,या महत्वाच्या प्रश्नी आजवर ठोस कार्यवाही होऊ शकली नाही.देशाच्या अनेक भागात आजही जुन्या पद्धतीने सफाईची कामे करून घेण्यात येत असतात.पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करते.अशी स्थिती असताना या कामगारांच्या भल्यासाठी निर्माण करण्यात आलेले आयोग काय करतात ? हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरीतच आहे.
या सफाई कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारने सफाई कामगारांची नोंदणीची अनौपचारीक पद्धत रद्द करणे,कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असणे,त्यांच्या हितासाठी करण्यात येणारे करारनामे,त्यांना समजू शकतील,अशा सोप्या भाषेत करणे,सफाई कामासाठी आधुनिक संसाधने उपलब्ध करणे,त्यांचे राहणीमान उंचावणे व पुरेसे वेतन,वैद्यकीय सोयी-सुविधा देणे,अशा सहा स्तरावर सरकारने काम केले तर या उपेक्षित कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल.त्यांची किती उपयुक्तता आहे,हे या आजाराच्या आक्रमणाने स्पष्ट झाले आहे.त्यामुळे सरकार या प्रश्नी ठोस पावले उचलेल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
२०१४ साली सत्तेत आल्या आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” स्वच्छ भारत अभियान,” छेडले व हातात झाडू घेतला.आज ते अभियान इतिहास जमा झाले आहे.हे अभियान सुरू करण्याऐवजी पंतप्रधानांनी सफाई कामगारांचे राहणीमान व त्यांना मिळणारे वेतन,हे दोन महत्वाचे प्रश्न हाताळले असते तर त्यांना हातात झाडू घ्यावी लागली नसती.असो ते अभियान एक राजकारणाचा भाग होता,तो आता भूतकाळात जमा झाला आहे.या अभियानाच्या जाहिरातीवर जेवढा खर्च झाला,तो अगर या कामगारांचे जीवन सुसह्य करण्यासाठी झाला असता,तर आज भारत नक्कीच स्वच्छ झालेला तुम्हा- आम्हाला पहावयास मिळाला असता.
तसेच कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या परिचारिका,या दुसऱ्या घटकालाही दुर्लक्षित करता येणार नाही.आजच्या घडीला या परिचारिका या आणीबाणीच्या प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत असतात.कमी वेतन,रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणारी वागणूक व कामाचा ताण,अशी स्थिती असताना या परिचारिका सुहास्यवदनेने सेवा देत असतात.सतत दिवसपाळी व रात्रपाळी करण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या भेडसावत असताना ” रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा,” मानून त्या काम करत असतात.कोरोना काळात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपणा सर्वांना झाली.एखाद्या रुग्णांवर उपचार करताना जर त्याचा मृत्यू झाला तर रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व परिचरिकाना मारहाण करतात.अशा लोकांना आता कळले असेल की आपल्या जीवनात यांच्या कार्याला किती मोल आहे.
या दोघांच्या साहाय्याने आपण कोरोनाची लढाई जिंकू शकलो.मात्र ही लढाई संपल्यानंतर मात्र ” येरे माझ्या मागल्या,”असे सुरु झाले आहे. देवदूत वाटणारे हे दोन घटक आपल्यासाठी कायम देवदूतच आहेत,हा विचार आपल्यामध्ये रुजला तर आपण बरेच काही साध्य केले असे होईल.

