दीपक मोहिते,
विरार लोकल …नाबाद १५८ वर्षे,
पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी विरार लोकल आज १५८ वर्षाची झाली.गेली दिड शतक अविरतपणे धावणारी विरार लोकल व तीचा डौल आजही कायम आहे.पश्चिम रेल्वेला आणि प्रवाशांंच्या जिवनाशी एकरूप झालेल्या या लोकलचा प्रवाशांना मात्र विसर पडला होता.
मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या पुढाकाराने हिंदुस्थानातील पहिली रेल्वे बोरीबंदर मार्गावर १६ एप्रिल १८५३ रोजी धावली.त्यानंतर तब्बल १४ वर्षानी म्हणजेच १२ एप्रिल १८६७ रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली विरार लोकल धावली.आताही पहिली विरार लोकल पकडणे म्हणजे तारेवरची कसरत. प्रचंड गर्दीत या लोकलमध्ये सीटवर बसायला सोडा,डब्यात शिरायलाही जागा मिळत नाही.तरीही प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली ही लोकल त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप झालेली आहे.नाबाद १५८ वर्षे पूर्ण करून १५९ वर्षांची झालेल्या या लोकलचा रुबाब आणि डौल अजूनही कायम आहे.अनेक कडू,गोड आठवणींच्या शिदोरीसोबत लाखो प्रवासी आजही या लोकलने प्रवास करीत आहेत. १२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून पहाटे ६.४५ ला पहिली लोकल धावली.तेव्हा एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून चर्चगेटसाठी सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.या ट्रेनच्या वाटेत निअल ( नालासोपारा ),बसीन ( वसई ), पाणजू ( वसईच्या दोन खाड्यांमधील स्थानक ), बेरेवाला ( बोरिवली ), पहाडी ( गोरेगाव ), अंदारू ( अंधेरी ), सांताक्रुझ ,बंदोरा ( वांद्रे ), माहीम,दादुरे ( दादर ), ग्रॕट रोड अशी स्थानके होती.६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत ही लोकल नंतर लांबलचक झाली.आता वातानुकूलित गाडीही आली.फलाट तयार झाले आणि पादचारी पूलही तयार झाले.आता तर या मार्गावर वातानुकुलीत लोकलही धावू लागली आहे.
आता रेल्वे प्रवाशांच्या जीवनात मेट्रो,मनोरेल या सर्व आधुनिक रेल्वेने प्रवेश केला आहे.दुसरीकडे रेल्वे मंत्रालय आता ग्रामीण भागातील खेडीदेखील रेल्वेने जोडू लागली आहे.बोरिवली,विरार आता थेट डहाणूपर्यंत उपनगरिय रेल्वेसेवा सुरु झाली आहे.ज्या भागात रेल्वे पोहोचते,त्या भागात विकासाला चालना मिळते व तो परिसर कात टाकतो,असा अनुभव आहे.त्यामुळे रेल्वे मंत्रालय शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात उपनगरीय रेल्वेसेवा उपलब्ध करण्यावर भर देत आहे.आज पश्चिम रेल्वे वर डहाणू व मध्य रेल्वेवर खोपोली,पनवेल पर्यंत उपनगरीय रेल्वेसेवा उपलब्ध आहे.लवकरच कर्जत – लोणावळा अशी रेल्वेसेवा सुरु होणार आहे.

