दीपक मोहिते,
” इथे रंगले मानापमानाचे नाट्य,अवघा महाराष्ट्र ओशाळला,”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काल राज्याचा दौरा पार पडला.या दौऱ्यात अमित शहा यांनी किल्ले रायगडला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन केले.पण त्यांच्या या दौऱ्यादरम्यान तीन इंजिन सरकारमधील सुंदोपसंदी उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली.यावेळी रंगलेल्या मानापमान नाट्यामुळे माध्यमामध्ये सर्वत्र खमंग चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या तीन इंजिन सरकारच्या मंत्र्यामध्ये मंत्रीपदे,मलईदार खाते व पालकमंत्रीपदावरून चांगलेच धमासान सुरू झाले होते.रायगड व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपदे वगळता अन्य समस्या कशाबशा मार्गी लागल्या.पण रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र सुटू शकला नाही.नाशिक येथे शिवसेना ( शिंदे गट ) – भाजप व रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प.गट ) – शिवसेना ( शिंदे गट ) हे एकमेकांसमोर उभे ठाकले.नाशिकच्या बाबतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली.मात्र रायगड जिल्ह्यात कॅबिनेटमंत्री भरत गोगावले व आ.महेंद्र दळवी यांनी मात्र टोकाची भूमिका घेतली.त्यामुळे तिढा सुटू शकला नाही.विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळाले.पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काल झालेल्या दौऱ्यात फडणवीस व शहा यांनी व्यासपीठावर अजित पवार याना डावलून एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी दिल्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या भुवया वर गेल्या.गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या आडमुठ्या वागण्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीच्या अनेक कार्यक्रमास अनुपस्थित राहिले.अर्थखात्याकडे आलेल्या अनेक विभागाच्या फायलीवर निर्णय न घेणे,विकासकामांसाठी निधी देताना दुजाभाव करणे,अशा कारणामुळे भाजप व शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अजित पवार
यांच्याविषयी कटुता निर्माण झाली आहे.यासंदर्भात
शिंदे यांनी आपली कैफियत अमित शहा यांच्या कानावर घातली होती.पण त्यावेळी शहा यांनी शिंदे यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.काल अचानकपणे शहा व फडणवीस यांनी अजित पवार यांना डावलून शिंदे यांना भाषणाची संधी दिल्यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे.मात्र शहा यांच्या या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अद्याप सुटू शकलेला नाही.

