दीपक मोहिते,
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका भाजप व अण्णाद्रमुक एकत्रितपणे लढणार,
अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडापाडी के.पलानीस्वामी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाचा सुपडा साफ झाला होता.दक्षिणेकडील एकाही राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही.त्यांना दक्षिणेत बिलकुल जनाधार नाही.त्यामुळे भाजप स्थानिक प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करत असतात. अण्णाद्रमुकने घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी आत्माघाती ठरण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आल्या नव्हत्या.उलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व द्रमुक यांच्या युतीला मोठा विजय मिळाला होता.या निवडणुकीत द्रमुकला २६.९३,अण्णा द्रमुक – २०.४६ तर भाजपला ११.२४ % मते मिळाली होती. ही आकडेवारी लक्षात घेता भाजपला अण्णाद्रमुकच्या मदतीने काही जागा जिंकणे शक्य होऊ शकते.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात प्रवेश मिळाल्यास ती अण्णाद्रमुकसाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते.
दोन दिवसापूर्वी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.ते म्हणाले की,१९९८ पासून जयललिता आणि अटलजी यांच्या काळात आम्ही एकत्र निवडणूक लढवत होतो.एक काळ असा होता,जेव्हा आम्ही लोकसभेच्या ३९ पैकी ३० जागा एकत्रितपणे जिंकल्या होत्या.भाजप आणि अण्णाद्रमुक मधील युती केवळ राजकीय नव्हती तर,ती विश्वास आणि विचारसरणीवर आधारित होती.
मोदी आणि जयललिता यांनी विकासासाठी काम केले आहे.
यावेळी शाह यांनी माजी मुख्यमंत्री जयललिता आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंधांची आठवण करून दिली आणि सांगितले की, दोन्ही नेत्यांनी नेहमीच तामिळनाडूच्या विकासासाठी एकत्र काम केले आहे.ही युती दोन्ही पक्षांसाठी उपयुक्त असून,आम्ही एकत्र निवडणुका लढवू.मंत्र्यांची संख्या आणि जागावाटपाबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल,असे सांगत सध्या एनडीएचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील भ्रष्ट द्रमुक सरकारला हटवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी शाहंनी द्रमुक सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या सरकारने आतापर्यंत सुमारे ३९ हजार कोटी रु.चे घोटाळे केले आहेत,ज्यामध्ये दारू घोटाळा आणि मनरेगा घोटाळा हे प्रमुख आहेत.आम्ही द्रमुक सरकारचे घोटाळे उघड करू, असा इशारा देत या भ्रष्टाचारासाठी तामिळनाडूतील जनता स्टॅलिन आणि उदयनिधी यांना कधीही माफ करणार नाही.

