दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्यात मराठी माणूस अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर…
परराज्यातून मुंबई,ठाणे व पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात स्थानिक भूमिपुत्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.ज्या प्रचंड वेगाने हे स्थलांतरण होत असल्यामुळे वसई,नालासोपारा,बोईसर भागात मराठी माणूस आता अल्पसंख्याक होण्याच्या मार्गावर आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वरील तीन विधानसभा मतदारसंघात परप्रांतियांच्या मतदानामुळे जिल्ह्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले.या निवडणुकीत परप्रांतियांची मते निर्णायक ठरली होती.पालघर जिल्ह्यात १९७० च्या दशकात उद्योग व कारखानदारीला वेग आला.तारापूर-बोईसर भागात महा.औद्यो.विकास महामंडळ तसेच वसई भागात लघुउद्योगाला चालना मिळाली,आणि रोजगारानिमित्त या भागात स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली.कालांतराने बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्या परप्रांतियांची वाढती संख्या लक्षात घेऊन एका विशिष्ट पक्षाने त्याना चुचकारण्यास सुरुवात झाली.त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये परप्रांतीय चेहरे दिसू लागले.त्यानंतरच्या काळात ही प्रक्रिया निरंतर चालूच राहिली.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाने नालासोपारा विधानसभा मतदारसंघात एका परप्रांतियाला उमेदवारी दिली.त्यामुळे त्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते.या निवडणुकीसाठी अनेक मराठी उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते.मात्र पक्षश्रेष्टींनी या मतदारसंघातील परप्रांतियांची लोकसंख्या लक्षात घेऊन इच्छुक मराठी उमेदवारांना उमेदवारी दिली नाही.कालांतराने बोईसर येथेही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे,या भागात परप्रांतियांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची मते परिमाणकारक ठरणार आहेत.पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्प कार्यान्वित होत असल्यामुळे येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्यात परप्रांतियांच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ होऊन मराठी माणूस अल्पसंख्यांक होईल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

