दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
बेफाम झालेल्या पोलीस यंत्रणेला सरकारने वेळीच रोखावे,पोलीस यंत्रणेत सुधारणा करावी,
गेल्या काही वर्षात आपल्या पोलीस यंत्रणेची प्रकृती प्रचंड ढासळली असून या व्यवस्थेत अक्षरशः बजबजपुरी निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांचा या यंत्रणेवरून विश्वास उडत चालला आहे.पोलीस आपल्या पदाचा धाक गुन्हेगारांऐवजी सामान्य नागरिकाना दाखवण्यात धन्यता मानत आहेत.तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करत त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सतत वाढत आहेत.अशात पोलीस व राजकारणी,अशी साखळी निर्माण झाल्यामुळे समाजात या दोघांविषयी प्रचंड चीड व संताप व्यक्त करण्यात येत आहे.
देश व राज्यात पोलीस अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे पोलीस यंत्रणा व रचनेमध्ये सुधारणा ( रिफॉर्मस ) करण्याची आवश्यकता आहे.सचिन वाझे,प्रदीप शर्मा अशा अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांना चकमकफेक म्हणून सरकारने डोक्यावर घेतले.आज असे अनेक अधिकारी विविध गुन्ह्याखाली गजाआड विसावले आहेत.अंतरवली सैराट पोलिसांकडून आंदोलकांना झालेली जबर मारहाण,बीड,अक्षय शिंदे,संतोष सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्या,उत्तर प्रदेशातील हाथरस,संभल या सर्व प्रकरणात पोलिसांची वागणूक अत्यंत घृणास्पद अशीच होती.राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल, मुंबईचे माजी आयुक्त परमवीर सिंग व पांडे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात.अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयाने पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये दोन अधिकारी चकमकीत जख्मी झाल्याचे सांगून रुग्णालयात दाखल झाले होते.त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार,राजकीय पक्षाच्या नेत्याच्या पत्नीने रुग्णालयात जाऊन त्यांचा सत्कार केला होता.भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी फडणवीस यांच्या हाती पिस्तूल देऊन “अखेर देवाभाऊंनी केले,” अशा आशयाचे फलक लावले होते.हे सर्व प्रकार पोलिसांचे राजकीयकरण करण्यासारखे होते व त्या पोलिसांना पाठीशी घालण्याचा होता.त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदार व प्रवक्त्यांनी आपले ऊर जोराने बडवण्यात धन्यता मानली होती.गेल्या काही वर्षात पोलीस यंत्रणा बेफाम झाली आहे.आज गुंडाना पोलिसांची भितीच उरली नाही.पुणे व बीड या जिल्ह्यात तर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर अशी झाली असुन सर्वसामान्य माणसांना जगणं कठीण झाले आहे.राजकारणी,गुंड व पोलीस यांची राज्यातील तीन इंजिनच्या सरकारप्रमाणे महायुती झाली आहे.त्यामुळे सरकारने पोलीस कारभारामध्ये पारदर्शकता व वचक राखण्यासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याची गरज आहे.

