दीपक मोहिते,
राजकीय वाव व्यवसायिक स्वार्थापोटी अनेक कुटुंबे दुभंगली,
हल्लीच्या काळात रक्ताच्या नात्यापेक्षा सत्तेचा हव्यास व स्वार्थ मोठा ठरला आहे.राजकारणात शिरलेल्या घराणेशाही प्रवृत्तीमुळे आज अनेक कुटुंबे दुभंगली गेली आहेत.भाजप हा काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर आजवर टीकेची झोड उठवत होता,पण आज त्या पक्षालाही घराणेशाहीचा शाप लागला आहे.मात्र याच घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्रात वावरणारी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली.त्यामध्ये गांधी,ठाकरे,मुंडे ही तर व्यवसायिक क्षेत्रातील अंबानी,हिरानंदानी,केसरी पाटील टूर्स,सिंघानिया व हावरे कुटुंबाचा त्यामध्ये समावेश आहे.सत्ता व अधिकार यांचे समान वाटप होत असेस्तोवर ही कुटुंबे एकत्रित होती.पण कालांतराने गृहकलहाची वात पेटली व कुटुंबे दुभंगली.सत्ता व स्वार्थ,अशा दोन कारणामुळे हे सारं घडतंय.आपल्या कुटुंब व्यवस्थेत आता मी व माझे कुटुंब ( मी,माझी पत्नी व मुलंबाळं ) ही संकल्पना मूळ धरू लागली आहे.ठाकरे कुटुंबात बाळासाहेब ठाकरे यांचा वारस कोण ? यावरून दोघे भाऊ समोरा समोर उभे ठाकले व ज्या बाळासाहेबांनी अथक प्रयत्नातून बलाढ्य अशी संघटना उभी केली,त्या संघटनेची अक्षरशः वाताहत झाली आहे.
ज्या गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेबाच्या मदतीने सेना – भाजपला सत्तेच्या सारीपाटावर आणले,त्या मुंडे कुटुंबाला देखील असेच ग्रहण लागले.त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले.गोपीनाथ मुंडे यांनी आपली कन्या पंकजा मुंडे यांना राजकारणात आणले व कुटुंबात ठिणगी पडली.

राष्ट्रीय पातळीवर इंदिरा गांधी सारख्या कणखर नेत्याच्या कुटुंबाला असेच गृहकलहाचे ग्रहण लागले व त्यांच्या सुनबाई मनेका गांधी यांनी कुटुंबाचा पारंपारिक विरोधक असलेल्या भाजपशी हातमिळवणी केली.ज्या नेहरू व इंदिरा गांधी यांनी आयुष्यभर धर्मनिरपेक्षता जपली,त्यांची सून त्यास छेद देत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपमध्ये स्थिरावल्या.शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणल्यानंतर त्यांच्या पक्षातही नाराजी निर्माण झाली होती,

पण ती अनेक वर्षे सुप्तावस्थेत होती.पण पवार यांनी आपल्या सेवानिवृत्तीचे संकेत देताच त्यांचे पुतणे अजित पवार यांनी उचल खाल्ली व पुढचे रामायण घडले.व्यवसायिक क्षेत्रालाही हा रोग जडला असुन अंबानी,हिरानंदानी,सिंघानिया यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला.हावरे व केसरी पाटील यांनी अत्यंत कष्टाने उभे केलेले व्यवसाय गृहकलहामुळे आज उतरणीला लागले आहेत.राजकीय स्वार्थ व सत्तेचा हव्यास,अशा दोन कारणामुळे आज अनेक कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहेत.कुटुंबातील गृहकलहामुळे आपल्या कुटुंबाचे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे,हे लक्षात येऊनही आपण भानावर येत नाही.कारण बदलत्या जीवनशैलीत स्वार्थ मोठा ठरला आहे.हिंदीत एक वाक्प्रचार आहे,” अंधेने अंधेके पास भीक मागी,दोनो बेहोष,” या वाक्याचा गर्भीत अर्थ आपण कधीच समजून घेतला नाही.

