दीपक मोहिते,
” ये रे माझ्या मागल्या,”
…आणि आमच्या मराठी अस्मितेचा कडेलोट झाला,
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पुन्हा कोलांटी उडी मारल्यामुळे मनसे सैनिक सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत.गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसे सैनिकांना आदेश दिला होता की ” बँकेचे व्यवहार मराठी भाषेत होतो की नाही तपासा,आणि नसेल होत तर त्यांच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्या.” त्यांच्या या आदेशानुसार मनसे सैनिकांनी बँकेत ” खळखट्याक,” सुरू केले.
सलग दोन दिवस हा खेळ सुरू होता.दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी डोळे वटारत ” कोण कायदा हातात घेत असेल तर कठोर कारवाई करू,” असा इशारा दिल्यानंतर राज ठाकरे यांचे अवसान पार गळून पडले.दरम्यान त्याच दिवशी सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व राज ठाकरे यांनी आंदोलन स्थगित केल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले.त्याचवेळी आमच्या मराठी अस्मितेचा कडेलोट झाला.
मनसेचे नेते राज ठाकरे गेल्या सतरा वर्षाच्या वाटचालीत आपल्या एकाही भूमिकेवर ठाम राहिले नाहीत.त्यामुळे त्यांच्या पक्षाला गेल्या सतरा वर्षात उभारी मिळू शकली नाही.पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी विधानसभेच्या अकरा जागा जिंकल्या होत्या.या विजयाने मराठी तरुणांना त्यांच्या नेतृत्वात एक आशेचा किरण दिसला होता.त्यानंतर नाशिक महानगरपालिकेवर मनसे चा झेंडा फडकवण्यात ते यशस्वी ठरले होते.पण हा आनंद केवळ काही महिनेच टिकला,त्यांचे अनेक आमदार व नगरसेवक यांनी त्यांची साथ सोडली आणि पक्षाची प्रचंड घसरण होत गेली.त्यांना आजतागायत पक्ष सावरता आला नाही.प्रत्येक भाषणात राज ठाकरे मराठी माणूस,मराठी अस्मिता,परप्रांतीयांचे आक्रमण,अशा संवेदनशील विषयावर बोलत राहिले,लोकांनी टाळ्या दिल्या,पण मते दिली नाहीत.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा फलक निरंक राहिला.त्यांना आपल्या होमग्राऊंडवर मुलालाही निवडून आणता आले नाही.आपल्या भूमिकेवर कायम न राहणे,हा त्यांचा स्थायी स्वभाव बनला आहे.त्यामुळे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.त्यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रचंड गर्दी होत असते,ती केवळ त्यांच्या नकला बघण्यासाठी असते.ही गर्दी मतदारांची नसते.त्यामुळे भविष्यात त्यांच्या पक्षाला सुगीचे दिवस येतील,असे समजण्याचे कारण नाही.
