दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अजित पवार यांनी स्वतःपासून सुरुवात करावी…
राज्याचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निमित्ताने नुकताच बीड जिल्ह्याचा दौरा केला.या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात त्यांनी आपल्या भाषणात पदाधिकारी व कार्यकर्त्याना सार्वजनिक जीवनात वावरताना नीट वागा,कोणाचा अवमान करू नका,अशा टीप्स दिल्या.वास्तविक अजित पवार यांचे नीट वागा व कोणाचा अवमान करू नका,या दोन वाक्याशी कधीही दुरान्वयाने संबंध आला नाही,कारण त्यांच्या भाषणातील बेताल वक्तव्याने ते अनेकदा अडचणीत आले होते.आज तेच अजित पवार आपल्या कार्यकर्त्याना मानभावी सल्ला देत आहेत.त्यांच्यामध्ये झालेला हा बदल स्वागतार्ह असला तरी तो किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.
आज ते ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.त्या जिल्ह्यावर एकेकाळी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व होते.त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी तो आपल्या ताब्यात घेतला.एकेकाळी सुसंस्कृत व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा हा नंतरच्या काळात बदनाम होत गेला.संतनिर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे थंडावली व गुंडनिर्मिती प्रक्रियेला प्रचंड वेग आला.आज हा जिल्हा गुंडगिरीच्या बाबतीत राज्यात क्रमांक एकचा जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे.जिल्ह्यातील अनेक गुंड अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबधित आहेत.या गुंडाचा आका वाल्मिक कराड व राष्ट्रवादी काँग्रेसची किती जवळीक होती,हे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उघड झाले आहे.आज अजित पवार हे आपल्या कार्यकर्त्याना नीट वागा,कोणाचा अवमान करू नका,असा सल्ला देत आहेत.वास्तविक अजित पवार यांनी आपल्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे.कारण,त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत अनेकदा बेताल व्यक्तव्ये करण्यात धन्यता मानली.अनेकांना अपमानित केले,पक्षातील ज्येष्ठानाही त्यांचा उर्मटपणा सहन करावा लागला आहे.शेतकऱ्यांना आम्ही धरणात मुतायचे का ? असे उद्दामपणे विचारणारे पवार यांच्यात खरोखर बदल झाला आहे की हा केवळ दिखावा आहे,हे आगामी काळात पाहावे लागेल.अजित पवार यांनी संभाजी महाराजासंदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपने तीन वर्षांपूर्वी त्यांचा राजीनामा मागितला होता.आज तेच अजित पवार भाजप सोबत सत्तेत आहेत.गेली अनेक वर्षे धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहेत,भाजपशी हातमिळवणी करण्यात या धनंजय मुंडे यांचे फार मोठे योगदान आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड गँगच्या गुंडाचा हात आहे,माहीत असूनही अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्यास तीन महिन्याचा अवधी लावला.आपल्या पक्षात इतर पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते असताना अजित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना अशाप्रकारचे सल्ले देतात,ही चांगली बाब आहे,पण त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून करायला हवी.तसं झाल्यास ” वाल्याचा वाल्मिकी,” झाला,असे म्हणू शकू..

