दीपक मोहिते,
प्रादेशिक पक्ष संपवणे,हा भाजपचा छुपा अजेंडा…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर गेल्या तेरा वर्षात भाजपने शिवसेनेला संपवण्याचे कसे प्रयत्न केले व त्यामध्ये ते कसे यशस्वी झाले ? यावर प्रकाश टाकल्यास भाजप प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी कशी कटकारस्थाने करतो,हे दिसून येते.आप,तृणमूल काँग्रेस,शिवसेना,बसपा, समाजवादी पक्ष व ईशान्येकडील लहान पक्षापैकी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ते धक्का देऊ शकले नाहीत.प्रादेशिक पक्षाशी सर्वप्रथम हातमिळवणी करून सत्तेत सहभागी व्हायचं आणि नंतर त्या प्रादेशिक पक्षाचे खच्चीकरण करायचे,अशी ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे.आंध्र प्रदेशमध्ये भाजपने माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पार्टीला असंच संपवले.त्यासाठी त्यांनी तेलगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांना हाताशी धरले.बिहारमध्येही त्यांनी अशीच खेळी केली,पण नितीशकुमार मात्र त्यांना पुरून उरले.तामिळनाडू,तेलंगणा व केरळ या तीन दाक्षिणात्य राज्यात मात्र त्यांची डाळ शिजू शकली नाही.जम्मू व काश्मीर राज्यात त्यांनी स्वतःचे बस्तान बसवण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टीशी ( पीडीपी ) युती केली.पण ही युती आपल्या हिंदू मतपेटीवर परिणाम करणारी ठरेल,हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ती मोडीत काढली.काही किरकोळ अपवाद वगळता भाजप या खेळीत चांगलाच यशस्वी ठरला.या सर्व घडामोडी घडत असताना भाजपच्या नेत्यांचे महाराष्ट्र राज्यावर बारकाईने लक्ष होते.हे राज्य आपण स्वतःच्या ताकदीवर जिंकू शकत नाही,हे लक्षात घेऊन १९८९ साली त्यांनी शिवसेनेशी युती केली.त्यानंतरच्या काळात भाजपने शिवसेनेसोबत हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला.प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हे युतीचे खरे शिल्पकार होते.मुंडे यांनी त्याकाळात काँग्रेसला अक्षरशः सळो की पळो करून सोडले.सहा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर १९९५ साली सेना-भाजप युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले.
सत्तेत आल्यानंतर मात्र दोन्ही पक्षात धुसफूस सुरु झाली.पण एखादा वाद टोकाला गेला की भाजपचे नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हे दोघेही मातोश्री गाठत असत.वाद मिटवायचे पण ते तात्पुरते स्वरूपात मिटत असत.एकमेकांची मने हळूहळू दुभंगत चालली होती,मतभेदाची दरी सतत रुंदावत होती.२०१४ साली जागावाटपावरून दोन्ही पक्षातील मतभेद विकोपाला गेले व दोघांनी आपल्या वेगवेगळ्या चुली मांडल्या.पण दोघांपैकी एकाही पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही.त्यामुळे दोघांनी पुन्हा सोयरीक जुळवली व युती पुन्हा सत्तेत आली.पण तुटलेली मने पुन्हा जुळू शकली नाहीत.अखेर २०१९ साली तीस वर्षे अभेद्य राहिलेली युती तुटली.मुख्यमंत्रीपद कोणाला ? यावरून निर्माण झालेला वाद चिघळत गेला.या वादाचा शरद पवार यांनी फायदा घेत उद्धव ठाकरे यांना गळाला लावले व राज्याच्या राजकीय क्षितिजावर महाविकास आघाडीच्या रूपाने नवे समीकरण जन्माला आले.पवार यांच्या या खेळीमुळे भाजपची अवस्था ” ना घरका,ना घाटका,” अशी झाली. हातातोंडाशी आलेला घास निसटल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते पार हबकून गेले होते.या सर्व घडामोडी भाजपच्या जिव्हारी लागल्या.त्यानंतर शिवसेना कोणत्याही परिस्थितीत फोडायची,असा षडयंत्र रचले गेले.त्यावेळी अडचणीत असलेले एकनाथ शिंदे गटाला हाताशी धरून शिवसेना त्यानंतर अजित पवार यांना सोबत घेत भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठीकऱ्या उडवल्या व राज्याच्या सत्तेचा लगाम पुन्हा आपल्या हाती घेतला.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची बक्षीसी मिळाली.त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले.या सर्व घडामोडीमध्ये मिळालेले यश हे भाजपच्या डोक्यात शिरले असुन जे प्रादेशिक पक्ष आपल्याला जुमानत नाहीत, त्या पक्षाशी सोयरीक करून त्यांना कमकुवत करण्याचे त्यांचे धोरण यशस्वी ठरते.हे भाजपच्या लक्षात आले असुन पुढील काळात ते प्रादेशिक पक्षांना नेस्तनाबूत करण्यासाठी रणनिती आखतील.परंतु आपल्या देशात भाषावर प्रांतरचना असल्यामुळे भाजपला आपला हा छुपा अजेंडा कायमस्वरूपी वापरता येणार नाही.

