दीपक मोहिते,
इतिहासाची मोडतोड,
नितेश राणे यांना गडकरी,भागवत व बावनकुळे यांच्याकडून, ” घरचा आहेर,”
काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनात मुस्लीम मावळे नव्हते,असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं.त्याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटत आहे.त्यांचे हे वक्तव्य भाजपच्या नेत्यांच्याही पचनी पडले नाही.तसेच अनेक इतिहास संशोधकांनी राणे यांचे विधान खोडून काढले आहेत.
” केंद्रीयमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी ” छत्रपती शिवाजी महाराज हे १०० % सेक्युलर होते,” गडकरी यांच्या विधानामुळे नितेश राणेंच्या त्या वक्तव्याची अक्षरश: पिसे निघाली.
दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलंय.त्यांच्या या वक्तव्याला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही समर्थन दिलं.तर सरसंघाचलक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज संघाचे आदर्श असल्याचं म्हटलंय.
दिल्लीत कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात बोलताना गडकरींनी शिवराय एक सेक्युलर आणि संवेदनशील राजे होते,असे म्हंटले.
मात्र काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनात मुस्लीम मावळे नव्हते,असं वक्तव्य केलं होतं.
त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्वधर्माचे लोक होते,असं म्हणत बावनकुळेंनी गडकरींच्या विधानाला पुष्टी दिली.सरसंघचालक मोहन भागवत यांनीही शिवरायांना आदर्श म्हटलं.छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श आहेत,असं सांगत भागवतांनी नितेश राणे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हणतात,तर दुसरीकडे भाजपचेच नितेश राणे मात्र महाराजांच्या सैन्यात मुस्लीम मावळे नसल्याचं जाहीर वक्तव्यं करतात.त्यामुळे इतिहासाची मोडतोड होण्यापेक्षा तथ्यांच्या आधारावर ख-या इतिहासाचा प्रसार होणं,अत्यंत महत्त्वाचं आहे.” जय शिवराय,” च्या मुद्द्यावरून नितेश राणेनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षालाही डिवचलं होते.
ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो,त्यांनी जय शिवराय बोलू नये,त्याऐवजी त्यांनी ” अल्ला हू अकबर, ” बोलावं,असा सल्ला नितेश राणेंनी दिला आहे.यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.काही महिन्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोनवर हॅलो ऐवजी जय शिवराय बोलण्याचा सल्ला दिला होता.त्यावरून नितेश राणेंनी सुनावलं आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जय शिवराय म्हणण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं आ.अमोल मिटकरी यांनी स्वागत केलंय. दरम्यान छत्रपती शिवजी महाराजांचं नाव आपण आदरानं घेतो.त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करायला हवं.असं शरद पवारांच्या पक्षाचे आ.रोहित पवारांनी म्हटलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे.तो राजकारणाचा नाही.मात्र दुर्दैवाने राज्यात केवळ राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर होत असल्याचं पाहायला मिळतंय.
नितेश राणे हे वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अधूनमधून बेताल वक्तव्ये करत असतात. पण त्यांच्या अशा वागण्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण निर्माण होते,याचे भान त्यांना राहत नाही.निदान आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती समज देण्याची गरज आहे. पण राणे यांना फडणवीस यांनीच मोकाट सोडल्याची चर्चा होत आहे. ” माझे कोणीही वाकडं करू शकणार नाही,कारण आपला बाप सागरवर बसला आहे. ” हे नितेश राणे यांचे विधान खूप काही सांगून जाते.

