दीपक मोहिते,
भयावह वास्तव,
राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या लाखाच्या वर….
आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आजवर खूप लिहिले गेले.पण शिक्षण व्यवस्थेमध्ये अपेक्षित सुधारणा व बदल होऊ शकले नाहीत.स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतरही आपली शिक्षण व्यवस्था हेलकावे खात आहे. या काळात शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेने बाळसं धरावे,यासाठी प्रयत्न करण्यात आले.पण परिस्थितीमध्ये बदल होऊ शकला नाही.नुकत्याच झालेल्या एका पहाणीत राज्यातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले शाळाबाह्य असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणानुसार राज्यात तब्बल एक लाखाच्या वर शाळाबाह्य मुले आढळून आली असून,ती ६ ते १४ वयोगटातील आहेत,असे स्पष्ट झाले आहे.
राज्यात शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले असल्याचा दावा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनानी केला आहे.या व्यवस्थेतील बजबजपुरी रोखण्यासाठी न्यायालयात अनेक वर्षांपासून २५ ते ३० याचिका दाखल आहेत.या याचिकावर अनेकदा सुनावणी देखील झाली.पण त्यावर ठोस असा निर्णय झाला नाही.राज्यात वयोगटातील जवळपास १ लाखाच्या वर शाळाबाह्य मुले राज्यात असल्याचे सांगण्यात आले.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे.सरकारकडून यावर ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे शैक्षणिक संघटनाना न्यायालयाचा आधार घ्यावा लागत आहे.ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचा ग्राफ सतत वाढत आहे.त्यामुळे साक्षरतेचे प्रमाणही उतरणीला लागले आहे. सरकारने ग्रामीण भागात ” शिका व साक्षर व्हा,” अशी मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.
तसेच शाळाबाह्य मुलांची वाढत्या संख्येला केवळ सरकारची उदासीनताच कारणीभूत नाही तर पालकही तितकेच कारणीभूत आहे. आपल्या मुलाबाळांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवा,आपली मुले शिकली तरच कुटुंबाचा विकास होऊ शकतो,हे लक्षात घेऊन आपल्या मुलांना शाळेत पाठवायला हवे.पण तसे होताना दिसत नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुले शेठजीच्या वाड्या,वीटभट्या व शेतीमध्ये काम करत असल्याचे पहावयास मिळतात.
दरवर्षी राज्य सरकार शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करत असते. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर सर्व्हेक्षण सुरु राहणे, हे महाराष्ट्रासारख्या सुशिक्षित व संस्कारक्षम राज्याला शोभेसे नाही.गडचिरोली,नंदुरबार, मेळघाट,नवापूर, तापीखोरे, पालघर जिल्ह्यातील जव्हार,विक्रमगड मोखाडा व तलासरी भागात सरकारने याविषयी मोहीम घेतल्यास या गंभीर समस्येची दाहकता समोर येऊ शकते.

