दीपक मोहिते,
घटस्फोटाची वाढती प्रकरणे, शाप की समाजाला जडलेला कॅन्सर ?
घटस्फोट,हा शब्दच आता कॅन्सरसारखा वाटू लागला आहे.पूर्वी एखाद्याला कॅन्सर झाल्याचे कळले कि जीवाचा थरकाप व्हायचा,व त्याच्या मृत्यूची बातमी कधीही कानावर येईल,अशी मनाची धारणा व्हायची.आज त्याच कॅन्सर सोबत ” घटस्फोट,” नावाच्या नव्या कॅन्सरने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.मानवाने जुन्या कॅन्सरवर जगभरात संशोधन केले,हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी मानवाने केलेल्या प्रयत्नाला अपेक्षित यशही मिळाले व काही अंशी तो नियंत्रणातही आला.
परंतु नव्याने आगमन झालेल्या कॅन्सरवर मात्र उपाय शोधणे, मानवजातीला अद्याप शक्य झाले नाही.जूना कॅन्सर,हा फ़क्त लागण झालेल्या एका व्यक्तीला मृत्युच्या दारी नेत असतो,परंतु घटस्फोटरूपी कॅन्सर,हा एकाच वेळी अनेकांचे जीव घेत असतो.या असाध्य रोगामुळे पति-पत्नीचे आयुष्य उध्वस्त होतेच,त्याच बरोबर त्यांच्या निरागस मुलांचेही भविष्य उध्वस्त होते.ही फुले उमलण्यापूर्वीच कोमेजु लागतात.दुसरीकडे घटस्फोटीत पति-पत्नीचे आई-वडीलही आयुष्याच्या अंतिम टप्प्यात एका वेगळ्या वळणावर येवून पोहोचतात.अचानक आपल्या सुखी-समाधानी जीवनावर घाला घालणाऱ्या त्या अंधाराकडे मागे वळून बघण्याची हिम्मतही आपल्याला होत नाही.आपली मुलगी व नातवांचे पुढे कसे होणार ? या एकाच चिंतेने त्याना खाट धरावी लागते.एकाच वेळी अनेकांचे बळी घेणाऱ्या या असाध्य रोगावर उपाय शोधणे शक्य नाही का ? आज तरी या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही.
पाश्चात्य देशाचे अनुकरण करताना आपण आपली संस्कृती,संस्कार विसरत चाललो आहोत.जगण्याची जीवनशैली बदलत गेली,स्वच्छंदी जीवनशैलीचा आपण केलेला स्विकार,हा आपल्या
कुटुंबव्यवस्थेवर घाला घालणारा ठरला.भविष्यात या तुटणाऱ्या नात्याचा काय परिणाम होईल,याची तमा न बाळगणारी नवी पिढी आता जन्माला आली आहे.मुलाबाळाना “आपले घरदार,” ही संकल्पनाच मान्य नाही.हॉस्टेल,वृद्धाश्रम,अनाथाश्रम,लिव्ह एंड रीलेशन्स व महिलाश्रम,या संकल्पना आता धुमाकूळ घालू लागल्या आहेत.या सर्व संकल्पना आपल्या समाजव्यवस्थेला शाप असल्याचे म्हंटले जाते.परंतु त्यास शाप म्हंटता येणार नाही.तो कॅन्सरच आहे, कारण तो समाजात वेगाने पसरतोय.कॅन्सर जसा शरीरात पसरत जातो,तसा हा कॅन्सर देखील समाजात वेगाने पसरत चालला आहे.
त्यामुळे या कॅन्सरवर नजिकच्या काळात औषध सापडेल,अशा भ्रमात कोणी राहता कामा नये.पशु-पक्षी व जनावरे यांची कुठे लग्न होतात,मानवासारखे ते कुठे सातफेरे घेतात,तरीही ते मरेपर्यंत एकमेकांशी प्रामाणिक राहतात,त्यांचे कधी घटस्फोट झाल्याचे आपण ऐकले का हो ? नाही ना,मग मानवजातीला लागलेला हा कॅन्सर रोखणे आपल्याला शक्य होईल का ? या प्रश्नाचे उत्तर नवीन पिढीने शोधायला हवे,असे वाटते,पण त्याची शक्यता फार कमी आहे.

