दीपक मोहिते,
पाणीटंचाईच्या झळा,
पालघर जिल्हावासिय यंदा भीषण पाणीटंचाईत होरपळणार 
पालघर जिल्ह्यात सालाबादप्रमाणे यंदाही तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस ती भेडसावू लागली आहे.शहरी भागात पाण्याचा सुळसुळाट तर ग्रामीण भागात महिलांची पाण्यासाठी पायपीट,असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.आगामी काळात या पाणीटंचाईची दाहकता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.पण लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासकीय अधिकारी अद्याप साखर झोपेत आहेत.
एप्रिल ते जून अखेर,या काळात पालघर जिल्हा पाणीटंचाईमध्ये होरपळून निघत असतो.या काळात नद्या,तलाव,विहिरी,
कूपनलिका,यामधील पाण्याची पातळी खोलवर जाते.यंदा तर या पाणीटंचाईची दाहकता अधिक जाणवेल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.कारण नद्या,तलाव,बंधारे सुकत चालले आहेत तर विहिरीमधील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे.ज्या गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे,तेथे त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे,पण प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतीही हालचाल झालेली नाही.दुर्गम भागातील आदिवासी तालुके मोखाडा,जव्हार,वाडा व विक्रमगडमधील अनेक ग्रामपंचायतींनी १४४ पाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.परंतु प्रशासनाने त्यादृष्टीने अद्याप हालचाल केली नाही.वास्तविक फेब्रु.किंवा मार्च महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीने पाणीटंचाई आराखडा तयार करून तो जिल्हा मुख्यालयाला पाठवायचा असतो.या आराखड्यानुसार जिल्हा मुख्यालय टंचाईग्रस्त गावांची वर्गवारी करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असते.पण गेल्या काही वर्षांपासून लालफितीच्या कारभारामुळे ही प्रक्रिया थंडावली आहे.जशा आमसभा इतिहास जमा झाल्या तसेच ही प्रक्रिया देखील बासनात गुंडाळण्यात येत आहे.

शहरी भागात तर वर्षाचे बारा महिने पाणीटंचाई ही नागरिकांच्या पाचवीला पुजलेली आहे.त्यामुळे नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो.त्यासाठी वर्षाकाठी त्यांना कोट्यवधी रु.चा भुर्दंड सोसावा लागतो.ज्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करून निवडून आले.ते आमदार व खासदार हे केवळ पाईपलाईन अंथरण्याच्या कामावर जाऊन व मंत्र्यांना निवेदने देण्यात धन्यता मानत आहेत.नालासोपारा शहराच्या पूर्व भागात दोन ते तीन दिवस आड पाणी देण्यात येते.काल नालासोपाऱ्यांचे आ.राजन नाईक हे कासा येथे रोहित्र बदलण्याच्या कामावर हजर झाले,अनेक सेल्फी निघाल्या व क्षणार्धात त्या सोशल मिडियावर झळकू लागल्या.अशा सेल्फीने नागरिकांची तहान भागणार नाही.तर प्रत्यक्षात कृती आवश्यक आहे.सोशल मिडियावर तूम्ही स्वतःची प्रसिद्धी करून घ्याल,पण लोकांच्या घशाची कोरड नाहीशी करू शकणार नाही. शहरी भागातील आपल्या लोकप्रतिनिधींना मुळात हेच माहीत नाही की आपल्या शहराला पाणीपुरवठा करणारी नदी व धरणे कोणती ? सूर्या हे धरण नसून नदी आहे,आणि आपल्याला ज्या दोन धरणातून पाणी सोडले जाते,त्यांची नांवे धामणी व कवडास अशी आहेत.हे आपल्या लोकप्रतिनिधीना ठाऊक नसावे,हे तुमचे- आमचे दुर्देवच म्हणावं लागेल. असो,खासदार,आमदार व पालकमंत्री यांनी आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करायला हवेत,अशी ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे.

