दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अजित पवार यांच्या एका वक्तव्याने महायुती सरकार अडचणीत येण्याची शक्यता….
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांना अक्षरशः उताणे पाडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ,असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला अजित पवार देखील उपस्थित होते. पण आता त्यांनी कोलांटी उडी मारत,मी आपल्या भाषणात कर्जमाफीबद्दल कधीही बोललो नाही,असे सांगत फडणवीस व शिंदे या दोघांना चांगलाच धोबीपछाड दिला आहे.अ
अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात.पण बोलण्याच्या ओघात त्यांची जीभ आजवर घसरली. धरणात पाणी नाहीतर आम्ही मुतायचे का ?असा प्रश्न विचारणाऱ्या अजित पवार यांच्यावर राजीनामा देऊन कृष्णाकाठी आत्मक्लेश उपोषणाला बसावे लागले होते.ते बोलण्याच्या भरात सार्वजनिक जीवनावर आपल्या वक्तव्याचे कसे पडसाद उमटतील,याची तमा बाळगत नाहीत.त्यामुळे ते अनेकदा अडचणीत आले आहेत.
आता त्यांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महायुती सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरकार राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका,खासगी बँका,ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत पीकासाठी कर्ज दिलं जातं.यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेतर्फे होते.फेब्रु. महिन्यापासून शेतकरी कर्जाचे हप्ते भरत असतात.मात्र,आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं.त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल,या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पिककर्ज माफी होणार की नाही,याबाबत दोन दिवसापूर्वी स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
बारामतीमध्ये नुकताच शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या.आर्थिक शिस्त गरजेची असते.विरोधकांनी जी टीका करायची ती केली,आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला.मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो,मला थोडीशी तरी अक्कल आहे.सगळी सोंग करता येतात,मात्र पैशाचं सोंग करता येत नाही.काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले होते.मी राज्यातील जनतेला सांगतो ३१ तारखेच्या आत कर्जाची संपूर्ण रक्कम भरा.जे आधी सांगितलं होतं,ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही,भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. पुढच्या वर्षाची पीक कर्जमाफी होणार नाही,तशी आपली परिस्थिती नाही,असं स्पष्टपणे अजित पवारांनी सांगितले.त्यामुळे महायुती सरकारचे मंत्री व आमदार प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अडचणीत आले आहेत. यासंदर्भात अजित पवार यांच्याशी लवकरात लवकर बोलू,असे सांगत वेळ मारून नेली.

