दीपक मोहिते,
मरगळ झटका आणि सक्रिय व्हा,अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या असतानाही वसईच्या राजकीय आघाडीवर अद्याप स्मशान शांतता पाहायला मिळत आहे.विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षात प्रचंड मरगळ आल्याचे अनुभवायला मिळत आहे.यातून वेळीच सावरला नाहीत तर कपाळमोक्ष अटळ आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ( उबाठा ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी हे तिन्ही पक्ष पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत.प्रत्येक माजी नगरसेवक व नगरसेविकांचे मनोधैर्य पार खचले आहे.या अशा बिकट परिस्थितीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी नाउमेद झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करण्यासाठी पुन्हा आवेशात मैदानात उतरणे आवश्यक आहे.पण तसे घडताना दिसत नाही.१९७७ साली इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा विरोधकांनी जबरदस्त मताधिक्याने पराभव केला होता.त्यावेळी आलेल्या वावटळीत काँग्रेस पक्षाचे होत्याचे नव्हते झाले होते.पण अवघ्या अडीच वर्षात इंदिरा गांधी यांनी स्वतःवर असंख्य खटले दाखल असतानाही अवघा देश पिंजून काढला व नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता पक्षाला धूळ चारली होती.त्यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय व देशातील राजकीय विश्लेषकांनी इंदिरा गांधी यांचा राजकीय अस्त झाल्याची हाकाटी सुरू केली होती.पण इंदिराजी यांनी कमरेला पदर खोचून देशाची अनेक राज्ये अक्षरशः पिंजून काढली.बिहार राज्यात त्यावेळी ” बेलची,” या गावात दलितांची हत्या झाली होती.त्या गावात रस्ते नसल्यामुळे आपल्याला वाहनाने जाता येणार नाही,त्यामुळे आपण हा दौरा रद्द करूया,असे राज्यस्तरीय नेत्यानी त्यांना सांगितले,पण इंदिरा गांधी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या,अखेर त्यांनी हत्तीवर बसून गावात घरोघरी जाऊन दलित कुटुंबाचे सांत्वन केले.त्यांची ही भेट ” टर्निंग पॉईंट,” ठरली.देशातील दलित जनता निवडणुकीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या पाठीशी एकदिलाने उभी राहिली.हे उदाहरण सांगायचे कारण असे की एक महिला प्रचंड विजय मिळवलेल्या जनता पक्षाच्या बलाढ्य सरकारला अल्पावधीत खाली खेचू शकते,यावर त्याकाळी परदेशातील राजकीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.यावरून आपण बोध घ्यायला हवा.राजकारणात हार जीत ही होतच असते,हे कायम गृहीत धरून चालायचं असत,जेव्हा सेनापती कच खातो,तेंव्हा आपल्या सैन्याची पळापळ सुरू होत असते,अशी अनेक उदाहरणे इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात.
आज बविआचे अनेक पदाधिकारी आमचे छुप्या पद्धतीने काम सुरू असल्याचे सांगत फिरत असतात,पण त्यामध्ये तथ्य नाही.सध्या पक्षाचे अनेक पदाधिकारी हे वेगळ्याच कामात गुंतलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक माजी सभापती व माजी नगरसेवक आगामी महानगरपालिका निवडणुकीत आपले काही खरं नाही,हे ओळखून आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संधान बांधू लागले आहेत.
दुसरीकडे नवनिर्वाचित आमदार व खासदार हे तक्रारी व निवेदने देणे,हा एकमेव अजेंडा राबवण्यात धन्यता मानत आहेत.ज्या पाण्याच्या प्रश्नाचे भांडवल करत ते निवडून आले.तो प्रश्न आजही ” जैसे थे,” स्थितीच आहे,४१ अनधिकृत इमारतीमधील कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम असून वेळ मारून नेण्यासाठी समिती नेमण्याचा येथील आमदार,खासदार व सरकारचा फंडा असून तो माणुसकीला काळे फासणारा ठरला आहे.महानगरपालिका करवाढ कमी करण्याचे नाटक केवळ करदात्यांची फसवणूक करणारी आहे.डंपिंग ग्राऊंडच्या आरक्षणाबाबतही महानगरपालिका व आमदार यांची मिलीभगत आहे,हे उघडकीस आले आहे.एकंदरीत या सर्व घडामोडी लक्षात घेता,वसईकर जनतेची प्रचंड फसवणूक सुरू आहे.त्यामुळे शिवसेना ( उबाठा ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी या तीन पक्षानी एकत्र येऊन जोरदार आघाडी उघडली पाहिजे,अन्यथा आगामी महानगरपालिका निवडणुकीत तिघांचाही कपाळमोक्ष होण्याची शक्यता आहे.

