दीपक मोहिते,
घणाघाती प्रहार,
छावा चित्रपट आल्यानंतर आपल्याला औरंगजेब कळला-राज ठाकरे,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दादरच्या शिवतीर्थावर भव्य मेळावा पार पडला.या मेळाव्याला खूप वर्षांनी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या अनेक ज्वलंत विषयावर घणाघाती हल्ला चढवला.त्यांनी महायुती सरकारला आपल्या भाषणात चांगलेच खडे बोल सुनावले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारची खिल्ली उडवली.
” औरंगजेबाची सजवलेली कबर काढून त्या जागी एक फलक लावा की ” मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला, ” असा सल्ला त्यांनी आपल्या भाषणात फडणवीस सरकारला दिला.
“औरंगजेबाचं राज्य कुठपर्यंत होतं ? अफगाणिस्तानपासून ते थेट दक्षिणेपर्यंत.छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून महाराष्ट्रात परत आले,राज्याभिषेक झाला आणि काही काळानंतर महाराजांच निधन झालं.या दरम्यानच्या काळात औरंगजेबाचा एक मुलगा दक्षिणेत आला.त्या औरंगजेबाच्या मुलाला छत्रपती संभाजीराजे यांनी जागा दिली म्हणजे शह दिला. १६८१ ते १७०७ म्हणजे सलग २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता.छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर औरंगजेब लढला.त्यांना अत्यंत क्रूरपणे मारले. राजाराम महाराज,संताजी धनाजी,ताराराणी लढल्या. एका पुस्तकात एक फार चांगलं वाक्य आहे.मराठे सर्व लढाया हरत होते,पण औरंगजेब मात्र एकही लढाई जिंकू शकत नव्हता,” असं राज ठाकरे म्हणाले.
“औरंगजेबाने तेव्हा परत जायला पाहिजे होतं.मात्र, एवढ्या मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा महाराष्ट्रात ठाण मांडून का बसला होता ? कारण औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण हे औरंगजेबाला जमलं नाही,सर्व प्रयत्न केले आणि शेवटी औरंगजेब येथेच मेला. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो.तेव्हा जगभरातील लोकांना कळायला हवं की औरंगजेब काय करायला गेला होता आणि कसा मेला.तेव्हा तेथे जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं,”
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत.
औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला.हा आमचा इतिहास आहे. ”
आज राज्यासमोर अनेक ज्वलंत विषय आहेत,पण त्या विषयांकडे कोणाचंही लक्षच नाही.सर्व विषय भरकटवले जात आहेत.आम्हाला जंगल व पाणी याच्याशी काही देणेघेणे नाही.आम्हाला दिसतो तो केवळ औरंगजेबचं.तो बसलाय द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय.औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की पाडली पाहिजे ? हे विषय आत्ताच कसे आले ? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाहीत.चित्रपट उतरला की हे देखील उतरले.छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं का ? अक्षय खन्ना चित्रपटात औरंगजेब बनून आल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला का ? व्हाट्सअपवर इतिहास वाचू नका. त्यासाठी तुम्हाला इतिहासाची पुस्तकं वाचायला हवी.

