दीपक मोहिते,
” सारं काही अजबच,”
सरकार एका गाण्याने इतके भयभीत का झाले ?
कुणाल कामरा याच्या गाण्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली आहे.कामरा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आ.राम कदम यांनी केली आहे.कुणाल कामरा याला परदेशातून फंडिंग होत असल्याचा त्यांनी सनसनाटी आरोप केला आहे.सनसनाटी आरोप करणाऱ्या भाजपच्या तुफानी ब्रिगेडमधील हे एक अग्रेसर नेते असून त्यांच्याकडे फारसे कोणी लक्षही देत नाही.” पोरींना उचलून आणण्याची,” शेखी मिरवणारे व भर सभागृहात एका पोलिसाला जबर मारहाण करणाऱ्यांकडून महाराष्ट्राला फारसे काही अपेक्षित नाही.
असो,त्यांच्या या आरोपामध्ये तथ्य असेल तर केंद्रीय तपास यंत्रणानी कुणाल कामरा यांच्या बँक खातीची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनीही कुणाल कामरा,हा देशात कुठेही लपला तरी त्याला आमचे पोलीस फरफटत खेचत आणतील,अशी सिंहगर्जना केली आहे.वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारीचा वाढता ग्राफ लक्षात घेऊन बोलायला हवे होते.संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी गेले पाच महिने पोलिसांना सापडत नाही.निष्पाप सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची पोलीस कोठडीत पोलिसांकडून हत्या होती, संतोष देशमुख यांची कन्या आम्हाला न्याय द्या, म्हणून टाहो फोडत आहे. शिवाजी महाराजासंदर्भात बेताल वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर चंद्रपूर येथे पोलीस मुख्यालयासमोर राहत होता,त्याला आपले पोलीस जेरबंद करू शकले नाहीत आणि आपले देसाईसाहेब म्हणतात,मुंबई पोलीस कुणाल कामराला फरफटत खेचून आणतील.कुणाल कामरा याच्या गाण्याने सत्ताधाऱ्यांची इतकी घाबरगुंडी का उडावी ? हेच कळेनासे झाले आहे.वास्तविक सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांनी वायफळ बडबड करण्याऐवजी कुणाल कामरा यांनी चूक केली असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी.त्यासाठी संविधानाने सरकारला अधिकार दिले आहेत.त्याचा वापर न करता प्रक्षोभक वक्तव्ये करणे,खोटेनाटे आरोप करणे,अत्यंत चुकीचे आहे.पण दुर्देवाने या सरकारला बरं व वाईट,यामधील फरकच कळत नाही.कुणाल कामरा याला फॉरेन फंडिंग होत असेल तर त्याचीही सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.

