दीपक मोहिते,
” केवळ भुलभुलैय्या,”
मनपा बैठक : केवळ एक औपचारिकता,फारसे काही निष्पन्न होणार नाही,
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रचलित पाणीपट्टी दर सुधारणा व मालमत्ता मागणी देयकात पाणीपुरवठा व मलप्रवाह लाभकर आकारणीबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सर्वपक्षीय समितीची काल बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीत नागरिकांच्या वतीने प्रशासनाला सूचना करण्यात आल्या,असे ऐकायला मिळत आहेत.त्या सूचना नक्की काय आहेत ? त्यांच्या या सूचना प्रशासनाने किती स्विकारल्या,याबाबतची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही.
महानगरपालिकेने जी बैठक बोलावली,ती एक औपचारिकता होती.त्यामुळे या सूचना कितपत अमलात येतील,याविषयी साशंकताच अधिक आहे.महानगरपालिका प्रशासकीय कामकाजाबाबत लोकप्रतिनिघींचा किती अभ्यास असतो,हा विषय देखील अत्यंत गहन असाच आहे.बांधकाम,साहित्य खरेदी, घरपट्टी लावणे व ठेकेदारी,या व्यतिरिक्त नगरसेवकांना मनपाची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प,निधीचा वापर,या महत्वाच्या विषयी बिलकुल स्वारस्य नसते.अनेक नगरसेवक हे केवळ केवळ बोट वर करण्यासाठी मनपाच्या सभेत उपस्थित असतात.सीताराम गुप्ता सारखा चाळमाफिया सलग दोन ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतो, याचा अर्थ आम्ही सुशिक्षित करदात्यांनी कसा घ्यायचा ? अशी मंडळी जर या समितीमध्ये असतील तर ते कसल्या डोंबल्याच्या सूचना करणार ?
प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही या नगरसेवकांच्या मर्यादा ठाऊक असल्यामुळे हे अधिकारीही अशा बैठकात माना डोलवत असतात.या अधिकाऱ्यानाही माहित असते,आपल्यासमोर बसलेल्या मंडळींचा ” वरचा मजला रिकामा असतो,” त्यामुळे ते माना डोलवतात. त्यांचे हे माना डोलवणे हे सकारात्मक प्रतिसाद असल्याचा समज करून घेतात व समोर आलेला चहा व अल्पोपहार यावर ताव मारत, समाधानाने सभागृहाबाहेर पडतात.
यापैकी काही नगरसेवक एखाद्या रस्त्याचे काम सुरु झाले की रोडरोलरच्या बाजूला उभे राहून सेल्फी काढण्यात धन्यता मानणारे असतात.त्यांना अशा विषयात बिलकुल स्वारस्य नसते.
सकाळी आपण टीव्ही लावला की दहा ते बारा चॅनेलवर पंधरा ते वीस बाबा प्रवचन देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.तसेच हे सेल्फीवाले नगरसेवक फेसबुक वर पाहायला मिळतात.त्यामुळे करदात्यांनी या बैठकीतून फारसे काही निष्पन्न होईल,अशा भ्रमात राहता कामा नये.नगरसेवकांची अशी परिस्थिती असताना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी अशा बैठकीत काय दिवे लावतात देवजाणे ?

