दीपक मोहिते,
” सावधान,”
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका,भाजप सहज खिश्यात घालणार,
राज्य विधानसभा निवडणुकीनंतर भाजप वगळता अन्य साऱ्या पक्षात सध्या एकप्रकारची मरगळ आली आहे.विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे सर्व पक्षाचे अवसान पार गळले आहे.दुसरीकडे भाजप मात्र अत्यंत छुप्या पद्धतीने निवडणुकीच्या कामाचे नियोजन करत आहे.कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका व जिल्हा परिषदा जिंकायच्याच या निर्धाराने पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
भाजपचा डोळा मुंबई व ठाणे महानगरपालिकेवर असून या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो.या दोन्ही ठिकाणी जागावाटप करताना भाजप हा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे गटाला फारशा जागा देतील असे वाटत नाही.आजच्या घडीला भाजपचे नेते या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे सांगत जरी असले तरी दुसरीकडे त्यांनी स्वबळाची तयारी देखील ठेवली आहे.अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी शिंदे गटाची अवस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी केली तर आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.राज्यात आपण एकत्र संसार करू,पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण स्वतःच्या ताकदीवर लढू या.असा छुपा अजेंडा त्यांनी तयार ठेवला आहे.मुंबई व ठाणे या दोन्ही महानगरपालिका या सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत,त्या भाजप,विरोधी पक्ष किंवा शिंदे गटाच्या हाती जाऊ देणार नाही.स्थानिक स्वराज्य संस्था जाहीर होण्यापूर्वी भाजप आपले लक्ष नवीन मतदार नोंदणी व मतदार यादीतून वगळणे,अशा दोन कामावर लक्ष केंद्रित करत असतो.हरियाणा व दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने हाच फंडा वापरत विरोधी पक्षाच्या मुसक्या बांधल्या.दिल्ली येथे अनेक मतदारसंघात सरासरी १५ ते १७ हजार मतदार गायब झाले.ज्यांची नांवे वीस ते पंचवीस वर्षांपासून होती,ती नांवे अचानक नाहीशी झाली.हरियाणा राज्यातही असेच घडलं.त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी व आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल या दोघांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली,पण आयोगाने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली.राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप हाच फंडा वापरेल,अशी शक्यता आहे.त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.पण विरोधी पक्षाची सध्याची अवस्था लक्षात घेता,भाजप या निवडणुकाही अगदी सहज आपल्या खिश्यात घालतील असे वाटते.

