दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भागृहाचा सन्मान व गरिमा,सर्वांनीच जपायला हवा…
काल कुणाल कामरा प्रकरणावर विधानसभा सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले.अत्यंत पोटतिडकीने सभागृहाचा आदर व सन्मानाबाबत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.वास्तविक विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज हे भारतीय संविधानानूसार चालणे,अपेक्षित असते.पण हल्ली तसं होत नाही.भारतीय संविधानाला सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या लेखी आता काडीची किंमत नसल्याचे वेळोवेळी अनुभवायला मिळाले.सभागृहाचा अवमान व सभागृहाची गरीमा यावर फडणवीस हे आपल्या भाषणात बरंच काही बोलले.सभागृहा प्रती त्यांची आत्मीयता व संवेदना आपण समजू शकतो.पण गेल्या साडेतीन ते चार वर्षाच्या काळात सभागृहाच्या गरिमाला नख लावण्याचे काम कोणी केले,याची पडताळणी केली तर महायुतीचे अनेक चेहरे समोर येतात.त्यामध्ये प्रामुख्याने नवनीत राणा,चित्रा वाघ,संजय शिरसाठ,सदाभाऊ खोत,नितेश राणे,राम कदम,प्रसाद लाड व अमोल मिटकरी,यांचा समावेश आहे.शरद पवार यांच्या आजारावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती.चित्रा वाघ यांनी सगळ्यावर कडीच केली.” मी ५६ जणांना पायाला बांधून फिरते,” अशाप्रकारची भाषा वापरली,त्यांच्या या एका वाक्याने अवघे राज्य अवाक झाले.त्यावेळी फडणवीस यांनी त्यांना रोखायला हवे होते,पण फडणवीस यांनी त्यावेळी बघ्याची भूमिका घेण्यात समाधान मानले.हल्ली ज्या तरुण मंत्र्यांला हिंदुत्वाचा उमाळा आला आहे,ते दुसऱ्या आमदारांला ” तुझ्या आजोबाला जाऊन विचार,” असे फर्मान सोडतात.तेंव्हाही फडणवीस यांना सभागृहाच्या गरिमाची आठवण होत नाही.नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ” तुमच्यात दम आहे का ? ” हे विचारणे,अशाप्रकारची भाषा वापरणे हे सभागृह व मुख्यमंत्रीपदाचा सन्मान व गरिमा जपणारं आहे का ? ज्या सभागृहात विलासराव देशमुख,यशवंतराव चव्हाण,साथी एसेम जोशी,वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील,श्रीपाद अमृत डांगे,या थोर विभूतीची भाषणे ऐकण्यासाठी एकेकाळी सभागृहाची प्रेक्षक गॅलरी तुडुंब भरायची.आज काय परिस्थिती आहे, याविषयी फडणविसानी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

