दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
कुणाल कामराचे गाणे : शिंदे यांचा गेम नक्की कोणी केला?
सध्या कुणाल कामरा यांनी सत्ताधाऱ्यांची झोप पार उडवली आहे.त्याच्या एका गाण्याने शिंदे गटाच्या पायाखालची जमीनच जणू सरकली आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी त्याच्या स्टुडिओची प्रचंड नासधूस केली.वास्तविक शिंदे यांनी कामरावर निंदानालस्ती केल्या प्रकरणी न्यायालयात दावा ठोकायला हवा होता,ते न करता त्यांच्या पिल्लावळीने हिंसक मार्ग स्विकारत त्याचा स्टुडिओ व ज्या हॉटेलमध्ये कामरा याचा शो होता,त्या हॉटेलचे जवळपास २५ लाखाचे नुकसान केले.आता या हॉटेलचा मालक सरकारला ” या प्रकरणी आमचा दोष काय ? असा प्रश्न विचारत आहे.या प्रश्नाचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे.
या मंडळींनी कुणालच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले, त्या स्टुडिओवर हल्ला केला. त्या गाण्यातील ” गद्दार व दाढीवाला,” हे दोन शब्द शिंदे यांच्या पिल्लावळीच्या अक्षरश: जिव्हारी लागले.वास्तविक ते तसे लागता कामा नव्हते.कारण हे दोन्ही शब्द गेले तीन वर्षे राज्याच्या कानकोपऱ्यात गाजत आहेत.त्यामुळे या प्रकरणी त्यांच्या समर्थकाकडून अशाप्रकारचे वर्तन होणे,मुळात चुकीचे आहे.वास्तविक याप्रकरणी शिंदे यांच्या समर्थकांनी कानाडोळा करण्याची गरज होती.पण त्यांच्या तोडफोड गँगने धुमाकूळ घातला. त्यांच्या या धुमाकुळाने आणखी एका महत्वाच्या बाबीवर शिक्कामोर्तब केले आहे.” गद्दार व दाढीवाला,” हा आपलाच नेता आहे.हे या घटनेमुळे सिद्ध झाले.एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणात वारंवार ” गद्दार, ” या शब्दाचा उल्लेख करत असतात.तसेच या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका,असा इशारा देत असतात.पण या कुणाल कामरा यांनी या दाढीवाल्याला खरोखरच हलक्यात घेतल्याचे पाहायला मिळाले.
शिंदे यांच्या शिवसेनेने कुणालचे खाजगीत अभिनंदन करायला हवे होते.
याचे स्पष्ट कारण असे की कुणालमुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भर मैदानात,सर्वांसमक्ष उतरून शिंदे यांचा जाहीर बचाव करण्याची वेळ आली.ज्या कृत्याची प्रतीक्षा शिंदे आणि त्यांच्या साजिंद्यांना इतका काळ होती,ती संधी या कामराने मिळवून दिली. त्याच्या गाण्यामुळे फडणवीस यांना इच्छा नसतानाही शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरावे लागले.त्यामुळे खरे तर शिंदे यांच्यापेक्षा फडणवीस यांनी कुणालवर संतापायला हवे होते.पण मनात नाही ते करायला लागले.पण ते केवळ वरून होते,आतून नाही.इच्छा नसतानाही फडणवीस हे रिंगणात उतरले,पण त्यांचा नेहमी असलेला आवेश मात्र पाहायला मिळाला नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे खरे तर कौतुक करायला हवे. अजितदादा म्हणाले, ” कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये आणि घटनेने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेत राहून बोलावे.” त्याची ही प्रतिक्रिया त्यांच्या पवार घराण्याला शोभेशी अशीच होती.जेव्हा स्पष्ट भूमिका घेण्याची गरज असते,तेव्हा पवार कुटुंबातील प्रत्येकजण सरधोपट काही तरी बोलून वेळ मारून नेत असतो,ही पवार कुटुंबाची एकप्रकारची खासियत आहे.
या सर्व घडामोडीवरून मनात मात्र शंकेची पाल चूकचूकते की शिंदे यांचा गेम नक्की केला कोणी ?

