दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वादंग होण्याची शक्यता…
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरु असताना आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खा.संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधीस्थळाजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला आहे.ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रायगडावरील या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.तसेच,वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती कुठून झाली, यावर त्यांनी भाष्य केलं आहे.एका नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं त्यांनी सांगितले.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक,हे कपोकल्पित स्मारक आहे,याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कोणतीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही.तसेच,वाघ्या कुत्र्याचं स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता.वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी जी मागणी केली आहे,ती योग्यच असल्याचेही इंद्रजीत सावंत यांनी पुढे म्हटले आहे.त्यामुळे, राज्यात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरुन वादंग सुरू असताना आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचाही मुद्दा आता चर्चेत आला आहे.
या समाधीची उभारणी २० व्या शतकात झाली.१९०६ मध्ये इंदूर संस्थांनाचे राजे तुकोजी होळकर यांनी या स्मारकासाठी ५ हजार रु.दान दिले होते.त्यानंतर १९३६ मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती व नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखाली या वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराजांच्या समाधीजवळ उभारण्यात आला.२०११ मध्ये संभाजी ब्रिगेड या मराठा संघटनेने वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला करून तो पाडला होता. मात्र तो पुन्हा उभारण्यात आला.मात्र या वाघ्याच्या पुतळ्यावरून आता दोन गट पडले आहेत.एका गटाने संभाजीराजे यांच्या मागणीशी सहमती दाखवली आहे.तर दुसऱ्या गटाने वाघ्याची कथा ही निष्ठा व भक्तीचे प्रतिक असुन तो हटवणे म्हणजे लोकभावनेचा अनादर ठरेल, असे स्पष्ट केले आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार हा केवळ एक पुतळा नसून तो निष्ठा व त्यामागे असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमीचे प्रतिक आहे,अशी भूमिका घेतली आहे.१६८० मध्ये महाराजांचे निधन झाल्यानंतर वाघ्याने आपल्या स्वामीच्या चितेवर उडी मारून स्वतःचे बलिदान दिले,अशी आख्यायिका सांगितली जाते.
पण कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या,पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खा.आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.तशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे,हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले.३१ मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा,अशी मागणी केली आहे.सध्या या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षण आहे.वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजे यांचे म्हणणे आहे.

