दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कुणाल कामरा प्रकरण : “आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” असे होता कामा नये,
- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे म्हणणाऱ्या कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड तोडफोड केली.या घटनेतील शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.कुणाल कामरा याने आपल्या गाण्यात थेट शिंदे यांना लक्ष्य केल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना अनावर झाल्या व ही घटना घडली.कामरा याने आपल्या गाण्यात जिव्हारी लागेल, अशाप्रकारची टीका करणे,न्यायाला धरून नाही.पण,शिवसैनिकांनीही हिंसक कृती करणे,हे देखील समर्थनीय नाही,हेही तितकेच खरे आहे.
पण हल्लीच्या काळात ” चुकीला माफी नाही,” हा नवीन फंडा अस्तित्वात आला आहे.” नो पोलीस,नो न्यायप्रक्रिया,” सिर्फ हम करेसो कायदा,” अशा पद्धतीने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वागत असतात.वास्तविक कुणाल कामरा याने केलेली ही अक्षम्य अशी चूकच आहे.पण त्याला शिक्षा देण्यासाठी आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे.पण हल्ली न्यायव्यवस्थेकडे जाण्याऐवजी तडकाफडकी न्याय मिळवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्यात येत असतात.आपल्या नेत्यांची सहानुभूती व लक्ष वेधून घेण्यासाठी हे कार्यकर्ते ” मोडतोड तांबा-पितळ,” असा मार्ग अवलंबत असतात.
दरम्यान,आज याविषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले,अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.त्यामुळे अशाप्रकारचे वागणे खपवून घेतले जाणार नाही.त्यांचे हे म्हणणे खरे आहे,पण प्रशांत कोरटकर,नितेश राणे,नारायण राणे,चित्रा वाघ,अमोल मिटकरी,ही मंडळी तर गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्वैराचाराला सतत खतपाणी घालत असतात.त्यामुळे या सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धाब्यावर बसवत स्वैराचार करणाऱ्यांना कायम अभय मिळत गेले. विधानसभेत फडणवीस जे काही बोलले ते ” आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” अशा पठडीत बसणारे आहे.या सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अनेकदा गळचेपी झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत.पण फडणवीस सरकार आपल्या सोयीप्रमाणे या स्वातंत्र्याचा वापर करत असते.कुणाल कामरा याला यथावकाश शिक्षा होईलच,पण शिवसैनिकाकडून झालेल्या हिंसाचाराचेही कदापि समर्थन करता येणार नाही.
भारतीय संविधानात कलम १९ ( अ ) नुसार भारताच्या सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे.त्यानुसार बोलण्याचा, ऐकण्याचा,जाणण्याचा व सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार दिला आहे, पण हे अधिकार अमर्याद नाहीत.दुर्देवाने ते आपण कधीच समजून घेतले नाही. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास दुजोरा दिला,पण तो केवळ कुणाल कामरा यालाच लागू होत नाही,अशाप्रकारचे खडे बोल त्यांनी यापूर्वी आपल्या लोकांच्या बाबतीतही सुनावणे गरजेचे होते.

