दीपक मोहिते,
आज जागतिक हवामान दिन : उद्देश अद्याप सफल होऊ शकला नाही..
दरवर्षी जगभरात जागतिक पर्यावरण,जागतिक जल,जागतिक वन,जागतिक हवामान दिनासह विविध दिन आपण साजरा करत असतो.हे दिन साजरा करण्यामागे ” जनजागृती, “असा उद्देश असतो.पण तो कितपत यशस्वी ठरला हे मात्र अद्याप कळू शकले नाही.हे विषय मानवी थेट निगडित असुन त्याचे चक्र विस्कळीत झाले तर ते विनाशाला आमंत्रण देणारे ठरते.सतत आदळणारी वादळे,भूकंप व त्सुनामी या साऱ्या घटना त्याची उदाहरणे आहेत.
आज जागतिक हवामान दिन आहे.तो एक सोपस्कार म्हणून जगभरात साजरा होईल.२३ मार्च १९६१ साली आपण पहिला हवामान दिन साजरा केला.ब्रिटिशाच्या राजवटीमध्ये बदलत्या हवामानाची सर्वप्रथम दखल घेण्यात आली होती.हवामानशास्त्राचा भक्कम वैज्ञानिक पाया हा १७ व्या शतकात वातावरणातील वायुच्या वर्तना संदर्भात उभारण्यात आला.
इ.स.१६३६ मध्ये हॅली या ब्रिटिश शास्त्रज्ञाने ” भारतीय उन्हाळी मान्सून,” हा आपला ग्रंथ प्रकाशित केला.
त्याआधी भारतीय प्राचीन ग्रंथ उपनिषदांमध्ये हवामानशास्त्राचा आणि सुर्य आणि पाऊस यांच्या परस्पर संबंधावर सविस्तर उहापोह करण्यात आला होता.
भारतामध्ये अनेक शहरात हवामान निरिक्षण केंद्रे आहेत. ही केंद्रे भारतीय हवामान विभागाची स्थापना होण्या अगोदरच अस्तित्त्वात आली होती.
उदा.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील हवामान आणि हवामानाचा अभ्यास करण्यासाठी १७८५ मध्ये कलकत्ता आणि १७९६ मध्ये मद्रास ( चेन्नई ) येथे अशी केंद्रे उभारली होती.
१७८४ मध्ये कलकत्ता आणि १८०४ मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालने भारतातील हवामानशास्त्रातील वैज्ञानिक अभ्यासाला चालना दिली.
कलकत्ता येथील कॅप्टन हॅरी पिडिंग्टन यांनी उष्ण कटिबंधीय वादळांशी संबंधित एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये १८३५-१८५५ दरम्यान ४० शोधनिबंध प्रकाशित केले आणि ” त्यातून चक्रीवादळ,” हा शब्द नावारूपाला आला.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात प्रांतिक सरकारांच्या आश्रयाखाली अनेक वेधशाळा स्थापन
करण्यात आल्या.
१८६४ मध्ये कलकत्त्यात विनाशकारी चक्रीवादळ आले होते.या वादळात प्रचंड नुकसान झाले होते.त्यानंतर १८६६ आणि १८७१ मध्ये अवर्षण निर्माण होऊन प्रचंड दुष्काळ पडला होता.
सन १८७५ मध्ये तेव्हा ब्रिटीशांच्या आधिपत्याखाली असलेल्या भारत सरकारने भारतीय हवामान खात्याची स्थापना केली.त्यानंतरच्या काळात देशातील सर्व हवामानविषयक कामे केंद्रीय यंत्रणेच्या अखत्यारीत आणण्यात आली.
भारत सरकारचे हवामान विषयक वार्ताहर म्हणून एच. एफ.ब्लॅनफोर्ड याची नेमणूक करण्यात आली.तर वेधशाळांचे पहिल्या महासंचालकपदी सर जॉन इलिअट यांची नियुक्ती करण्यात आली.काही काळानंतर
त्यांची मे १९८९ मध्ये कलकत्ता येथील मुख्यालयात बदली झाली होती.हवामान विभागाचे मुख्यालय नंतर शिमला,पुणे आणि शेवटी नवी दिल्ली येथे हलवण्यात आले.
हवामानविषयक निरिक्षणे घेणे,आणि हवामानाचा ज्या व्यवसायांवर किंवा क्रियांवर परिणाम होतो.कृषी क्षेत्र,मासेमारी,हवाई वाहतूक, समुद्रातील तेलाचं उत्खनन इ. कामावर काय परिणाम होतो याविषयी अभ्यास व निरीक्षणे, या विभागाच्या माध्यमातून होऊ लागली.
हवामान विभागाचा विस्तार
अशाप्रकारे होत गेला.१८७५ साली भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली.स्थापनेनंतर हवामान विभागाने हवामानविषयक निरीक्षणे,दळणवळण,अंदाज आणि हवामान सेवांसाठी आपल्या पायाभूत सुविधांचा हळूहळू विस्तार केला.
हवामान विभागाने समकालीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. निरीक्षणात्मक माहिती गोळा करण्यासाठी आणि इशारे पाठविण्यासाठी हवामान टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.
हवामान विभाग,हे देशातील अशा काही मोजक्या संस्थांपैकी आहे.जेथे संगणकांचा वापर आधी सुरु झाला.
देशात आलेल्या पहिल्या काही इलेक्ट्रॉनिक संगणकांपैकी एक संगणक हवामान शास्त्रातील वैज्ञानिक प्रयोगांसाठी आयएमडीला देण्यात आला होता.
त्यानंतर इन्सॅट सॅटेलाईट भारताकडून तयार करण्यात आला.सतत हवामान निरीक्षण आणि विशेषत: चक्रीवादळांचे इशारे देणे,हे इन्सॅटचं प्रमुख काम होतं.

