दीपक मोहिते,
मागचा वाईट अनुभव,
नदीजोड प्रकल्प : अर्थसंकल्पात ८८ हजार कोटी रु.ची आर्थिक तरतूद,फडणवीस/ विखे पाटील यांनी सावध राहण्याची गरज,
अर्थमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्याची घोषणा केली आहे.या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रु. असून,त्याचा ३ लाख ७१ हजार २७७ हे.शेतजमिनीला फायदा होणार आहे.गेली अनेक वर्षे हा नदीजोड प्रकल्प धूळ खात पडला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.वाजपेयी यांनी त्यावेळी खा.सुरेश प्रभू यांना या योजनेच्या प्रमुखपदी नियुक्त केले होते.प्रभू यांनीही या योजनेचे काम धूमधडाक्यात सुरु केले होते. पण कालांतराने कुठे माशी शिंकली,हे कळले देखील नाही.कोट्यवधी रु.खर्च झाल्यानंतर ही योजना अचानकरीत्या बसनात गुंडाळली गेली.त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ही योजना पुनर्जिवीत केली.सध्या नदीजोड योजना प्रकल्प बुलेटट्रेन प्रमाणे मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.त्यामुळे अजित पवार यांनी तो राबवण्याचा निर्णय घेतला असावा.पण तो कितपत यशस्वी होईल,याविषयी अनेक जलतज्ञ जरा साशंकच आहेत. कारण काही वर्षांपूर्वी अजित पवार व सुनील तटकरे हे दोघे जलसंपदामंत्री असताना ७० हजार कोटी रु.चा कसा चुराडा झाला होता व किती हेक्टर जमीन ओलीताखाली आली हे सर्वश्रुत आहे.आज तेच अजित पवार ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर शेतजमिनीला फायदा होणार आहे,असे सांगत सुटले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोघांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.
काल अजित पवार यांनी आज केलेल्या अर्थसंकल्पांत विविध नदीजोड प्रकल्पाबाबत सविस्तर विवेचन केले.ते म्हणाले,सरकारकडून वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रु. असून,प्रकल्पाचे लाभक्षेत्र ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर इतके आहे.या प्रकल्पाचा लाभ नागपूर,वर्धा,अमरावती, यवतमाळ,अकोला व बुलढाणा या ६ जिल्ह्यांना होणार आहे.या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू आहेत.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार ५७६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत साडेसात हजार कोटी रु.आहे,
गोदावरी नदीजोड प्रकल्प,
दमणगंगा – एकदरे – गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील ९ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील २ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल.या प्रकल्पाची अंदाजित किंमत २ हजार ३०० कोटी रु.होईल.
तापी महापुनर्भण प्रकल्प,
या प्रकल्पाविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले, शासनाने महत्त्वकांक्षी तापी महापुनर्भरण हा १९ हजार ३०० कोटी रु.किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे.या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भातील खारटन पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार,
कोकणातील उल्हास व वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून ५४.७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.त्यातून मराठवाड्यातील सुमारे २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.या प्रकल्पाचे सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम सुरू आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजना,
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी २०० मेगावॅट क्षमतेच्या १ हजार ५९४ कोटी रुपयांच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसें.२०२४ अखेर १२ हजार ३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून, हा प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सन २०२५ – २६ साठी १ हजार ४६० कोटी रु.चा नियतव्यय प्रस्तावित आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी ही जी माहिती दिली आहे,जो निधी या प्रकल्पाला देण्याचे जाहीर केले आहे,तो नक्की कारणी लागेल का ? आणि हा नदीजोड प्रकल्प मार्गी लागून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का ? भविष्यात या दोन प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री फडणवीस यांना द्यावी लागणार आहेत.

