दीपक मोहिते,
मोदी सरकारने दडपशाहीचा अवलंब न करता विद्यार्थ्याशी संवाद साधावा,
भारतासह जगातील अनेक देशात सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु झाली आहेत.या देशातील नागरिक आपल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरले असून अनेक शहरात लोकांनी जाळपोळीचे सत्र आरंभले आहे. महागाई, बेरोजगारी व शिक्षण व्यवस्थेतील सावळागोंधळ व अन्य काही कारणे, या घटनाच्या मागे आहेत.फ्रान्समध्ये जे काही चालले आहे, त्यामागे इस्लामिक कट्टरवादी असून काल त्यांनी देशातील १४३ वर्षे जुना ऐतिहासिक टाउनहाल बेचीराख केला.आज हा देश आगीत होरपळत आहे.या आंदोलनात सुमारे १० लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत.
त्यानंतर आता ब्राझील,अल्बनिया, स्पेन, अर्जेंटीना,बेल्जीएम व इटली या देशातही आंदोलनाचा भडका उडाला आहे.
आपल्या देशातही विविध शहरात विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आंदोलने सुरु केली आहेत. गेल्या दोन महिन्यापासून ही आंदोलने सुरु आहेत. पण हे आंदोलन सामोपचाराने मिटावी, यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. सरकार ही आंदोलने दडपण्यासाठी बळाचा वापर करत आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या मारहाणीमुळे वातावरण बिघडत चालले आहे. विद्यार्थ्याशी समोरासमोर बसून चर्चा करणे व त्यातून मार्ग काढणे, असे प्रयत्न सरकारकडून व्हायला हवेत, पण सरकार विद्यार्थ्याशी बोलणी करणे, म्हणजे आपला पराभव, असे समजून ही आंदोलने दडपण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारकडून होणारे हे प्रकार आगीशी खेळ करण्यासारखे आहेत.त्यामुळे मोदी यांनी वेळ न दवडता या संघर्षात सुवर्णमध्य काढावा. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका व म्यानमार या देशात गेल्या वर्षांपासून जेन – झी सक्रिय झाले आहेत व त्यांनी आपापल्या देशातील सत्ता उलथवून टाकल्या. दक्षिण आशियातील अनेक देशांना विस्कळीत करण्याचे प्रयत्न झाले व होत आहेत. यामागे बलाढ्य परकीय शक्ती सक्रिय झाल्या आहेत. या शक्ती आपल्या देशातही सक्रिय झाल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण आशिया खंडामध्ये भारताचे वर्चस्व निर्माण होऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. मध्यपूर्वेत इराण हे इस्लामिक राष्ट्र सर्व क्षेत्रात करत असलेली प्रगती व देशातील तेलाचा असलेला मुबलक साठा, अशा दोन कारणामुळे या देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिका व इस्त्रायल हे दोघे संयुक्तपणे कामाला लागले आहेत. त्यामुळे मोदी सरकारने अहंकार बाजूला सारून विद्यार्थ्यांनी सूरू केलेले हे आंदोलन चिरडण्यापेक्षा तोडगा काढावा. आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तान या शत्रूराष्ट्राला अमेरिका व चीन ज्या पद्धतीने मदत करत आहेत, ते पाहता भारताने देशाच्या अंतर्गत जे काही मतभेद व समस्या आहेत, त्याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. आग विझवायला वेळ लागतो पण आग पसरायला केवळ काही क्षण पुरेसे असतात, हे लक्षात घेऊन सरकारने ही आंदोलने हाताळायला हवीत.

