दीपक मोहिते,
” घडलंय बिघडलंय, ”
सत्तास्पर्धेच्या हाणामारीमध्ये एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार ?
नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मोठा राजकीय धमाका झाला आहे. शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमंत्री ( शिंदे गट )
गुलाबराव पाटील यांनी जगदंबा देवीच्या चरणाला स्पर्श करून प्रार्थना केली की ” येत्या काळात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी,” व
जो जो शिंदे साहेबांना आडवा येईल… त्याचा सत्यानाश होवो,” पुढे ते म्हणाले, सध्या आमच्याकडे ६० आमदार आहेत, विधान परिषद धरून ७३ आणि मित्रपक्ष धरून ८५-८६ चा आकडा आहे. प्रत्येक आमदाराने शेजारच्या मतदारसंघातून एक आमदार निवडून आणला तर पुढचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच होतील.
त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले.या विधानाचा अर्थ भाजपला थेट धमकी आहे का ? अशी चर्चाही सुरू झाली. कारण सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि गुलाबराव पाटील हे त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री आहेत.तरीही त्यांनी अशाप्रकारच्या वादाला तोंड फोडल्यामुळे यामागे ” बोलवता धनी, ” कोण ? याविषयी सर्वत्र खमंग चर्चा सुरु झाली आहे.शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत ( उबाठा )
यांनी महायुतीला घेरताना
म्हणाले, ” मंत्री गुलाबराव पाटील यांनी धमकी दिली आहे, की शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गात येणाऱ्याला संपवले जाईल. हा माणूस फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काय लॉरेन्स बिश्नोई गँगचे लोक बसलेत का ? कोणाला संपवणार ? फडणवीसांना ? ही एकप्रकारची त्यांनी थेट धमकीच दिली आहे. त्यांच्या धमकीवर फडणवीस मूग गिळून का बसले आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे गटातून मुख्यमंत्रीपदाचा दबाव पुन्हा वाढवण्यात येत आहे, असे मानण्यात येत आहे. प्रताप सरनाईक, रामदास कदम यांनीही शिंदेंना ‘ भावी मुख्यमंत्री,’ म्हटले आहे.भाजप – शिंदे सेनेत मुख्यमंत्रीपदावरून आतून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र यातून स्पष्टपणे दिसत आहे.या सर्व घडामोडीनंतर भाजपचे प्रवीण दरेकर व गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. गुलाबराव पाटलाच्या विधानावर भाष्य करताना म्हणाले,” आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं बोलणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, एकमेव व्यक्ती व्यक्तीच मुख्यमंत्री व्हावा, आणि इतरांचा सत्यानाश व्हावा, असं बोलणं चुकीचं आहे. राजकीय महत्वाकांक्षा असणं ठीक आहे, पण सत्यानाश होईल, असं त्यांनी बोलायला नको होतं. मुख्यमंत्री बदलाचा विषय कुठेच चर्चेत नाही. मुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी १४५ जागा निवडून याव्या लागतात, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लावला. तर गिरीश महाजन यांनी महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, पण गुलाबरावांच्या ” सत्यानाश,” च्या बोलण्यावर भाजपच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजपने आता अधिकृतपणे जाहीर केले की मुख्यमंत्री बदलणार नाही आणि धमकीवजा बोलण्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीमध्ये सत्ता स्पर्धेला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे.

