दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
२०२९ मध्येही भाजपचा पराभव होणे अशक्यच…
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सध्या देशभरात रान उठवले आहे.
भारत जोडो यात्रा, ईव्हीम मशीन घोटाळा,मतदारयाद्यातील त्रुटी, वाढती महागाई व निर्गुणवंतुणूक धोरण व वाढती बेरोजगारी इ. प्रश्नावर मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे.पण त्याचे अपेक्षित परिणाम होताना मात्र पाहायला मिळत नाहीत. राहुल गांधी हे मोदी सरकारच्या कारभाराला लक्ष्य करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. सदर बाब भारतीय जनतेच्या गळी उतरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प. बंगाल, आसाम, बिहार या तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हाती काही लागले नाही. उलट त्यांच्याशी साथसंगत करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे देखील पानिपत झाले. सोनिया गांधीनंतर पक्षाच्या नेतृत्वाची कमान राहुल गांधी यांच्याकडे सोपवल्यानंतर काही किरकोळ अपवाद वगळता इतर राज्यात पक्षाची प्रचंड पीछेहाट होत गेली. २०१४ साली भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो झंझावात निर्माण केला, त्यामध्ये काँग्रेस पक्ष हा अक्षरशः पत्त्यासारखा कोसळला.हा झंझावात इतका प्रचंड होता की अनेक जुन्या काँग्रेसजनाची जोरदार पळापळ सुरु झाली. आपल्या पक्षाचे जहाज बुडू लागले आहे, त्यामुळे आपले काही खरं नाही, अशा भितीमुळे काँग्रेसचे खासदार, आमदार व ज्येष्ठ नेते पक्ष सोडून पळू लागले. त्याच सुमारास मोदी यांनी ” काँग्रेसमुक्त भारत,” अशी घोषणा करत या पळणाऱ्या लोकांसाठी आपल्या पक्षाची दारे सताड खुली केली. आजच्या घडीला अनेक काँग्रेसजन केंद्र सरकार तसेच भाजपच्या अनेक राज्य सरकारामध्ये मंत्रिपदावर पाहायला मिळत आहेत. वास्तविक गेल्या बारा वर्षात राहुल गांधी यांनी पक्षबांधणीकडे लक्ष दिले असते, तर आज त्यांच्या पक्षावर अशी पाळी आली नसती.राहुल गांधी यांच्या प्रत्येक आंदोलनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो, पण त्याचे रूपांतर मतामध्ये होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे.आजच्या घडीला अनेक राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पार ढेपाळलेल्या अवस्थेत आहे. अंतर्गत मतभेद पराकोटीला पोहोचले आहेत. आपल्या मुलाबाळांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसजन एकमेकांच्या उरावर बसत आहेत. विकासाचे राजकारण करण्याऐवजी पाडापाडीचे राजकारण करण्यात ही मंडळी मशगुल आहेत. दुसरीकडे भाजपमध्येही असे प्रकार होतात, पण शहा यांच्या भितीमुळे भाजपवाले बंडखोरी व आपापसातील मतभेद उघडपणे जाहीर करत नाहीत. राहुल गांधी हे अभ्यासू नेतृत्व आहे, पण पक्षबांधणी व पक्षाच्या नेत्यांवर त्यांचा वचक नाही. त्यामुळे पक्ष येणाऱ्या निवडणुकीत फारसे काही करू शकेल, असे वाटत नाही. २०२९ ची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंडिया आघाडीला हात चोळत बसावे लागणार आहे. ही निवडणूक देखील भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता अधिक आहे.

