दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट,”
दसरा मेळावे आता केवळ सोपस्कार ठरले आहेत…
काल विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवसेना ( उबाठा ) व शिवसेना ( शिंदे ) या दोघांचे सालाबादप्रमाणे दसरा मेळावे पार पडले. या दोन्ही मेळाव्यात शिवसैनिकांना आपले दोन्ही नेते नेहमीप्रमाणे एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळाले. गेल्या सहा वर्षांपासून हे असंच सुरु आहे. त्यामुळे हल्ली होणाऱ्या दसरा मेळाव्याचा नेमका उद्देश काय ? असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो.
काल शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या ( उबाठा ) मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार शिंदे व शहा यांना लक्ष केले. आपल्या भाषणात रिजीम चेंज का करायची नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यानी मतदारयाद्यातील त्रुटी, कायदा / सुव्यवस्था व इतर राजकीय मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली.मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांना संदेश देताना ” संविधानाची मशाल बनून या, वाजत – गाजत गुलाल उधळत या, ” असे आवाहन केले होते.
दुसरीकडे गोरेगावच्या नेस्को येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या ” होय, आम्ही सत्ता बदलणार, व १३ कोटी मतदार गायब ” या टिकेवर पलटवार करताना एकनाथ शिंदे म्हणाले, इंडिया आघाडी हा दहा तोंडाचा रावण आहे. मतांची खरी चोरी २०१९ मध्ये झाली. आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, अन्नधान्य किट्सचे वाटप, असे जनहिताचे निर्णय घेतले.या दोघांच्या भाषणात केवळ एकमेकांवर टीका करणे व उखाळ्या पाखाळ्या व टोमणे या व्यतिरिक्त काहीही नव्हते. हे असे सतत होत असल्यामुळे हे मेळावे अलिकडच्या काळात फारसे प्रभावी ठरू शकले नाहीत.त्यामुळे बाळासाहेबांच्या काळात झालेले मेळावे आजही शिवसैनिकांच्या स्मरणात आहेत. दसरा मेळावा हा एक सोपस्कार ठरला आहे, असे म्हंटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. पूर्वीचा उत्साह, शिवसैनिकांचे वाजत गाजत,गुलाल उधळत व ढोलताशाच्या गजरात सभास्थळी येणे,आता हळूहळू इतिहास जमा होऊ लागले आहे.

