दीपक मोहिते,
राज्यात होळी व धुलीवंदनाची जोरदार धूम,
होळी व धुलीवंदन या दोन सणाची बाजारात धूम सुरू झाली आहे.पूजेचे साहित्य,विविध प्रकारचे रंग,पिचकारी इ.साहित्य खरेदीसाठी महिला व बाळगोपाळांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.हिंदू लोकांचा हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.यंदाही तो त्याच पद्धतीने साजरा होणार आहे.होळी हा सण आपण का साजरा करतो,हा सण साजरा करण्यामागे कोणती पार्श्वभूमी आहे,हे सर्वप्रथम आपण जाणून घेणे गरजेचे आहे.
पूर्वी हिरण्यकश्यपू हा एक राजा होता,तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचा, आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही,अशी त्याला घमंड होती.पण गर्वाच घर नेहमी खाली असते,या न्यायानुसार या हिरण्यकश्यपू याने त्याचा मुलगा प्रल्हाद याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले,पण त्यामध्ये यश येत नसल्याचे पाहून त्याने त्याची बहीण होलिका हीची मदत घ्यायचे ठरवले.या होलिकाला असा वर होता की तिला अग्निदेखील जाळू शकत नव्हता,म्हणून हिरण्यकश्यपू याने प्रल्हादला तिच्या मांडीवर बसवून आगीत मारण्याचा डाव आखला.परंतु झाले उलटेच प्रल्हाद तसाच राहिला व होलिकाचाच त्यात अंत झाला.तो दिवस म्हणजे होलिकोत्सव होय.समाजातील सर्व अनिष्ट व अनैतिक गोष्टीचा होळीत नष्ट होऊ दे,असा उद्देश हा सण साजरा करण्यामागे आहे.” चांगल्याला साथ देऊन वाईटाचा घेऊ बळी,सगळेजण साजरी करू आनंदाची होळी,असे या सणाचे घोषवाक्य आहे.
बदलत्या आधुनिक काळात सणाचे रूप बदलत गेले असले तरी राज्याच्या ग्रामीण भागात आदिवासी,शेतकरी व मजूर,आजही पूर्वापार चालत आलेल्या रूढी,परंपरा,प्रथा जपत हा सण पारंपारिक साजरा करत असतात.आदिवासी समाज हा सण सलग पाच दिवस साजरा करत असतात.या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो.गावाच्या मध्यभागी होळी उभारली जाते.त्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर ती पेटवण्यात येते.या दोन दिवशी खेड्यापाड्यात तारपा,गरबा,ढोलनाच व अन्य कार्यक्रम पार पडतात.आदीवासी रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतरित होत असला तरी हे दोन्ही सण साजरा करण्यासाठी दरवर्षी तो आपल्या मूळ गावी परतत असतो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा सण साजरा केला जातो.पालघर जिल्ह्यात धुलिवंदन सणाच्या दिवसापासून आठ दिवस आदिवासी भागात बोहाडाचे आयोजन करण्यात येते.मोखाडा येथे जगदंबा मातेचे मंदिर आहे.या बोहाडा उत्सवातून आदिवासी समाजजीवन व पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येते.हा बोहाडा गेल्या तीनशे वर्षांपासून चालत असल्याचे सांगण्यात येते.धुलिवंदन हा सण बाळगोपाळासाठी एक पर्वणी असते.या दिवशी ग्रामीण भागातील लहान मुले आपल्या भागातील रस्त्यावर बांबूच्या काठ्यांनी वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पोस्त ( पैसे ) वसूल करतात.वाहनचालक व पादचारी देखील आनंदाने हे पोस्त देत असतात.शहरी भागात धुलिवंदन केवळ एक दिवस साजरा करण्यात येत असतो.तर ग्रामीण भागात तो सलग पाच दिवस साजरा केला जातो.” रंग व आनंदाची उधळण,” असा या धुलिवंदन सणाचा मुख्य उद्देश असतो.तर होळी या सणामागे ” दुष्टप्रवृत्तीचा नाश व चांगल्याची सुरुवात,” अशी संकल्पना आहे.

