दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान : सरकार लाज कोळून प्यायली आहे…
अधिवेशनाचा कालचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत होणाऱ्या अवमानप्रकरणी गाजला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आमचे महाराज हल्ली राजकारण्यांच्या कचाट्यात सापडले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान व अवमान,या दोन विषयावर सतत राजकारण होत आहे.या राजकारणी मंडळींना महाराजांबद्दल किती आस्था आहे,याविषयी सर्वसामान्यजनाच्या मनात साशंकता आहेच,पण महाराजांच्या नावाने घाणेरडे राजकारण करणाऱ्या या नतद्रष्ट मंडळीबद्दल चीड व संताप देखील आहे.
गेल्या काही वर्षांपासून काही राजकीय पक्ष हे हिंदुत्व व छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता,हे दोन भावनात्मक विषय हाती घेऊन चांगभलाच राजकारण करत आहेत.हे दोन्ही विषय राज्याच्या रयतेसाठी अत्यंत संवेदनशील असे विषय असून या माध्यमातून राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजत असतात.या विषयाला हात घातल्यानंतर भोळ्याभाबड्या जनतेचे आपल्या स्वैर कारभाराकडे दुर्लक्ष होते,हे या मड्याच्या टाळूवरील लोणी खाणारे राजकारणी ओळखून आहेत.गेल्या पाच वर्षात माजी राज्यपाल कोश्यारी यानी तर याविषयी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख करत आपल्या अकलेचे तारे तोडले होते.पण त्यांना सत्ताधाऱ्यांनी कधीही जाब विचारला नाही.आज तेच राजकीय नेते विधानसभा अधिवेशनात महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही,अशा आवेशपूर्ण घोषणा करताना पाहायला मिळत आहेत.
या राजकारण्यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आस्था असती तर अरबी समुद्रात प्रस्तावित करण्यात आलेल्या शिवस्मारकाची एक तरी वीट लागली असती.या शिवस्मारकाचे २४ डिसें.२०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.आज तेच मुख्यमंत्री सभागृहात महाराजांच्या विषयी कोणी अवमान केला तर त्याला सोडणार नाही,अशा भीमगर्जना करताना आपण पाहत आहोत.आ.अबू आझमीवर निलंबनाची कारवाई झाली,ती व्हायलाच हवी होती.पण कोरटकर व सोलापूरकर यांच्यावर कारवाई का होत नाही ? ” आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या,” याला न्याय देणे म्हणतात का ? मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही महिन्यात कोसळतो,हा महाराजांचा अवमान नाही का ? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी घाईघाईने उभा करण्यात आलेला महाराजांचा पुतळा पत्याच्या किल्ल्यासारखा कोसळतो,हा राज्यसरकारकडून झालेला महाराजांचा अवमान नाही का ? राज्यात महाराजांच्या नावानं जे काही गलिच्छ राजकारण सुरु आहे,त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच… सरकार या सर्व प्रकरणी लाज कोळून प्यायली आहे,असंच म्हणावे लागेल.

