दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,
दहशतवादी हमास आपल्या देशाच्या उंबरठ्यावर…
इस्रायल-हमास याच्यामध्ये युद्धविराम झाल्यामुळे दक्षिण आशियामधील देशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.पण हमास आता भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.भारताशी हमासची थेट दुश्मनी नसली तरी इस्त्रायलशी असलेली आपली जवळीक त्याच्या डोळ्यात सलू लागली आहे.त्यामुळे त्यांनी भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या अतिरेकी संघटनाना बळ देण्याचे काम सुरु केले आहे.
गेल्या महिन्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रावळकोट शहरांमध्ये ५ फेब्रु.रोजी एक कार्यक्रम झाला.” कश्मीर सॉलिडेरिटी आणि हमास ऑपरेशन,” ” अल अक्सा फ्लड कॉन्फ्रेंस, ” असं या कार्यक्रमाचे नाव होतं.या कार्यक्रमामध्ये हमास नेते डॉ.खालिद अल-कदूमी सहभागी झाले होते.आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत या मंचावर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी देखील उपस्थित होते.पाक व्याप्त काश्मीरमध्ये आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात हमास नेत्याने सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या कार्यक्रमात दहशतवाद्यांनी फक्त भारताविरोधात भाषणेच केली नाहीत,तर हमासचे झेंडे फडकवत मोटरसायकल आणि घोड्यांवर बसून शक्ती प्रदर्शनसुद्धा केलं.त्यामुळे आगामी काळात दहशतवादी संघटना हमासच्या मदतीने काश्मीरमध्ये धुमाकूळ घालतील,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
हमास नेत्याच्या पाकव्याप्त काश्मीर मधील त्यांच्या उपस्थितीनंतर इस्रायलने भारताला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे.पाकिस्तानचे समर्थन असलेल्या दहशतवादी संघटनांसोबत हमासची हातमिळवणी चिंताजनक असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.भारताने हमासचा दहशतवादी संघटनांमध्ये समावेश करावा,अशी मागणी इस्रायलने केली आहे.भारताने अजूनपर्यंत हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं नाही.भारतीय कायद्याच्या युएपीए अंतर्गत आतापर्यंत ४४ संघटनांना दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे.पण त्यामध्ये हमासचे नाव नाही.
अमेरिकेने १९९७ साली त्यानंतर यूरोपियन युनियन, कॅनडा,ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलय.रशिया,चीन आणि तुर्कीसारख्या देशांनी अजून हमासला दहशतवादी संघटना ठरवलेलं नाही.७ ऑक्टो.२०२३ रोजी हमासने इस्रायलमध्ये भीषण दहशतवादी हल्ला केला होता.इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखला जातो.त्यानंतर गाजा युद्धाची सुरुवात झाली.यात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले.अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर या दोन्ही देशांना युद्धाविराम करण्यास भाग पाडले.त्यामुळे गेले वर्षभर सुरु असलेला नरसंहार पूर्णपणे थांबू शकला.मुस्लिम देश व त्यांच्या देशातील दहशतवादी संघटना यांच्या दक्षिण आशिया खंडातील कारवाया लक्षात घेऊन भारत आणि इस्रायलने मागच्या काही वर्षात आपले परस्पर संबंध अधिक मजबूत बनवले आहेत.संरक्षण क्षेत्रात दोनही देश एकमेकांना एकमेकांना भरीव मदत करत असतात.२००२ मध्ये स्थापन झालेली “ भारत-इस्रायल जॉइंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर-टेररिझम,” ची दरवर्षी बैठक होते.या बैठकीत सीमा सुरक्षा,दहशतवादी फंडिंग आणि सायबर सुरक्षा सारख्या मुद्यांवर चर्चा होत असते.पण आता या उपखंडात हमासची झालेली एंट्री ही भारत व इस्त्रायल या दोन्ही देशांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे इस्त्रालयने आपल्याला अलर्ट राहण्याचे कळवले आहे.

