दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर जिल्हा पर्यावरण ; सरकारच आपल्या जीवावर उठलंय,
स्थानिक प्रशासनाचा निर्लज्जपणा,खादाड वृत्ती व सरकारची उदासीनता अशा तीन कारणामुळे येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्याचे होत्याचे नव्हते होणार आहे.मातीचोरी,रेतीउपसा,वृक्षतोड व अनधिकृत दगडखाणी आदी कारणामुळे निसर्गरम्य पालघर जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे.दुसरीकडे प्रदूषणातही मोठ्याप्रमाणात वाढ होऊ लागली आहे.मात्र या गैरप्रकारात गुंतलेल्या समाजकंटकासमोर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन लोटांगण घालण्यात धन्यता मानत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पालघरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.हा जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.या दुष्टचक्रात मानवी जीवन लयाला जाण्याची शक्यता आहे.
या सर्व गैरप्रकाराला केंद्र व राज्य सरकार कसं खतपाणी घालत आहे,हे अनेक घटनांवरून स्पष्ट होत आहे.वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या महाकाय बंदरासाठी भर समुद्रात २० कोटी घनमीटर रेतीचा भराव टाकण्यात येणार आहे.त्यासाठी केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाने हे बंदर उभारणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या वाढवण पोर्ट प्रा.लि.या उपकंपनीला समुद्रातील १० हजार १७७ हेक्टर जागेचा परवाना दिला आहे.केंद्र सरकारच्या खणनकार्य ( विकास व नियमन ) कायदा २००६,अंतर्गत हा परवाना दिला आहे.हे सारे सोपस्कार पार पडताना सरकारने या सर्वाचा मानवी जीवनावर किती परिणाम होणार आहे,याचा विचार केलेला नाही.भर समुद्रात रेतीचा भराव झाल्यामुळे समुद्रातील जलचराची उत्पत्ती व संवर्धन यामहत्वाच्या बाबींना सरसकट धाब्यावर बसवत हा परवाना देण्यात आला आहे.ज्या केंद्र सरकारने डहाणू तालुक्यातील वृक्षसंपदा लक्षात घेऊन १९७० च्या दशकात या परिसराला पर्यावरण सुरक्षिततेचे कवच दिले होते,तेच सरकार आता पर्यावरणाची ऐसीतैसी करण्यात धन्यता मानत आहे.
केंद्र व राज्यसरकार पालघर जिल्ह्यावर एकामागोमाग विनाशकारी प्रकल्प लादत असून केंद्र सरकार पालघर जिल्ह्याचे निसर्गरम्यपण हिरावून घेत आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यामुळे होणारे प्रदूषण,अनधिकृत दगडखाणीमध्ये होणारे अवैध खोदकाम,त्या अनुषंगाने वातावरणात वाढत असलेले धुळीचे प्रमाण,ग्रामीण भागातील अवैध मातीउपसा,इ.कारणामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात मानवी जीवन धोक्यात येणार आहे.वातावरणातील वाढते धुळीचे प्रमाण व विषारी वायूमुळे अनेक गावातील बालकांना विविध आजारांनी ग्रासले आहे.तालुक्यातील चिल्हार-बोईसर या राजमार्गावर दगडखाणीमधून बाहेर पडणाऱ्या धुळीची चादर वर्षाचे बारा महिने पसरलेली असते,पण जिल्हाधिकारी व तहसीलदार या रस्त्यावरून येजा करताना डोळ्यावर कातडे ओढून बसलेले असतात.त्यामुळे भविष्यात पालघर जिल्हा हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदशील झाल्यास आपण नवल वाटून घेता कामा नये.

