दीपक मोहिते,
जनतेचा प्रचंड दबावासमोर सरकारला झुकावे लागले,पण सरकारची अब्रू गेली,
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.गेल्या तीन महिन्यापासून राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.पण सरकारपक्ष मात्र जोवर धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे मिळत नाहीत,तोवर त्यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही,असे सांगत होते.काल देशमुख यांची हत्या करतानाचे व्हिडियो व छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले.या हत्येतील छायाचित्रे व व्हिडियो पाहून सरकार देखील हादरून गेले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघामध्ये काल सुमारे तासभर चर्चा झाली.या बैठकीत मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,असा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार त्यांचा राजीनामा घेण्यात आला.आज सकाळी विधानसभेत दाखल होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी ” मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारल्या,” चे माध्यमांना सांगितले.हा जनतेचा विजय असला तरी सरकारची या प्रकरणी अब्रू पार लयाला गेली.मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती देताना फडणवीस जे काही म्हणाले,ते निंदाजनक असेच आहे.ते म्हणाले,मुंडे यांनी ” नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला.” त्यांचे हे वक्तव्य माणुसकीला धरून नसल्याची टीका होत आहे.गेले तीन महिने या मुंडेंची नैतिकता कुठे गेली होती ? अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सुरू झाली आहे.या सर्व घडामोडीवरून या मुर्दाड सरकारची लक्तरे वेशीला टांगली गेली आहे.
धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामा घेऊन देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही.या हत्येतील आठ आरोपीसोबत धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.या हत्येमधील प्रमुख आरोपी कराड हा धनंजय मुंडे यांचा सहकारी असून त्यांच्या गँगने बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात जो हैदोस घातला,निष्पाप लोकांच्या हत्या केल्या,त्यामुळे या सर्व आरोपीसह मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे,अशी मागणी करत बिडवासीयांनी आज जिल्हा बंद करण्याचे जाहीर केले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासात बीड जिल्ह्यातील सारे व्यवहार ठप्प झाले.या प्रकरणी सरकार ज्या पद्धतीने वागलं ते पाहता,हे सरकार महायुती सरकार नाही,तर या सरकारला ” नराधम सरकार ,” असेच म्हणावे लागेल.

