दीपक मोहिते
” हल्लाबोल,”
सारं काही संपल्यात जमा…
संतोष देशमुख यांची हत्या करताना काढण्यात आलेले फ़ोटो वायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशीरा बैठक घेऊन या प्रकरणी चर्चा केली.निदान या चर्चेनंतर तरी सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतात की पुन्हा त्यांचा बचाव करत राहतात,याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील हादरवणारे फोटो सोशल मीडियावर काल व्हायरल झाले आणि उभा महाराष्ट्र सुन्न झाला.अत्यन्त अमानुष पद्धतीनं देशमुख यांची अत्यन्त निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्याची छायाचित्रे व व्हिडीओ आरोपीनी काढले होते.ते सारे सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर या कृत्याचा निषेध समाजाच्या सर्व थरातून केला जात असून,आता बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.देशमुख हत्या प्रकरणातील आरोप पत्रात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली ? त्याची छायाचित्रे समोर आल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते सोशल मीडियाचा आधार घेत घडल्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत आहेत.मात्र हा संवेदनशील विषय टिपेला पोहोचला असताना अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी मात्र निर्लज्जपणे मुंडे यांच्याविरोधात पुरावे मिळाले तर वरिष्ठ नेते कारवाई करतील,असे सांगत सुटले आहेत.मिटकरी ही व्यक्ती बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती असून,त्यांच्या वाचाळ व वायफळ बडबडीमुळे पक्ष अनेकदा अडचणीत आला होता.तरीही या निर्लज्ज व्यक्तीला अजित पवार यांनी त्याना प्रवक्तेपदी कायम ठेवले आहे,यावरून पवार यांच्या विरोधात संपूर्ण राज्यातून निषेधाचे सुरु उमटू लागले आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीसुद्धा सोशल मीडियाचा आधार घेत व्हायरल झालेले हे फोटो पाहता या वृत्तीचा आणि गुन्हेगारांची शिक्षा लांबवणाऱ्यांवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.” माणसांना संपवण्यासाठी … दहशत वाढवण्यासाठी सत्ता हवी असेल तर आग लागो अशा सत्तेला… ” अशा शब्दांत अंधारे यांनी घडल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.त्या पुढे म्हणतात,
” मी राक्षस बघितला नाही. दंतकथेत त्याची वर्णन ऐकली व वाचली आहेत.पण आजचे फोटो बघितल्यानंतर त्या राक्षसांचे चेहरे कसे दिसत असतील,त्याची कल्पना येतेय. हा सारा प्रकार तुम्हा -आम्हाला प्रचंड अस्वस्थ करणारा आहे.कितीही प्रयत्न केला तरी श्वास आणि मन अजूनही संतुलित करता येत नाही.माझी ही अवस्था असेल तर ज्या माऊलीने लेकरू गमावले त्या मायमाऊलीचं काय..?
इतकं क्रौर्य उरात घेऊन माणसा जगतात तरी कशी..? आपल्याकडे सत्ता असली पाहिजे,सत्ता असल्यानंतर आपल्याला गोरगरिबांचे प्रश्न मांडता येतील.त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवता येईल,असं वाटत होतं.पण संतोष अण्णाच्या बाबतीचे जे घडले ते बघितल्यानंतर माझ्याकडे सत्ता नाही,याचा मला आनंद आणि समाधान वाटतय.तुम्ही कुठला तो पिक्चर म्हणताय,तो मी बघितलेला नाही पण कदाचित त्याच्यात सुद्धा औरंगजेबाच्या क्रौर्याची ही परिसीमा दाखवली नसेल.
इतका हिंसक आणि क्रूर विचार घेऊन ही माणसं जगत कशी असतील.यांच्या रक्तामांसाच्या कुटुंबीयांना बोलताना,भेटताना पोटच्या लेकराच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवताना त्या पोटच्या लेकराला अशा गिधाड्यांच्या हातात माया जाणवत असेल का की त्यांचंही अंग शहारून,थरारून जात असेल.
आपला बाप,भाऊ,मुलगा इतका क्रूर आहे की त्याने प्रेमाने जरी पाठीवरून हात फिरवला तरी त्याची नखं आत रुतून जातील आणि आपण रक्तबंबाळ होऊन जाऊ,हा विचार त्यांच्या लेकरांच्याही मनात येत असेल का… ?
एवढं होऊनही बीड शांत आहे. परळी शांत आहे.परळीतील राजकीय नेतेमंडळी शांत आहेत.त्यांच्या शांत असण्याची कारणे काहीही असू द्या,पण मी शांत आहे.मी का शांत आहे.मी दहशतीखाली आहे का ? का मला सतत भीती वाटतेय ? असे प्रश्न प्रत्येक बिडवासियांनी स्वतःला विचारायला हवा..

