दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
महायुतीचे सरकार : एक नालायक व निर्दयी सरकार,
विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणी आता संकटात सापडू लागल्या आहेत.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची दिवसाढवळ्या छेड काढली.या घटनेनंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या टवाळखोराविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.छेड काढणारे तरुण हे एकनाथ शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.अखेर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगरच्या डि.वा.एस.पी.ची भेट घेऊन आपली तक्रार नोंदवली.राज्याचे गृहखात्याने निर्लज्जपणाचा कळस गाठला असताना राज्याचे प्रमुख त्यांची तळी उचलण्यात धन्यता मानत आहेत.त्यांचे अशाप्रकारचे वागणे अत्यंत किळसवाणे आहे.पण सत्तेपुढे शहाण नाही,हेच खरे…
महायुती सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे.पण सरकारला त्याची चाड नाही.केंद्रीय मंत्र्यांची मुलगी देखील या राज्यात सुरक्षित नाहीत, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.स्वारगेट एसटी आगारात घडलेले प्रकरण ताजे असताना ही घटना घडल्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात त्याचे जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे.या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी प्रमाणे सरावासारव करत फिरत आहेत.आजवर घडलेल्या अनेक घटनासंदर्भात ते शब्दाचे खेळ करत वेळ मारून नेताना पाहायला मिळाले.हे गुंड शिंदे गटाचे स्थानिक आ.चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत.पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र हे तरुण एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगताना दिसतात.आपल्या पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री त्या घटक पक्षाचे नांव देखील घेऊ शकत नाही,प्रकार ” सत्तेसाठी असलेली लाचारी, ” या सदरात मोडणारे आहे आणि त्याचे वर्णन अत्यंत ” लाजिरवाणे,”असेच करावे लागेल.ज्या एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महिलांना ” आनंदाचा शिधा, ” व ” लाडकी बहीण योजना,प्रचंड गाजावाजा करत अंमलात आणली.आज त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मुलींची दिवसढवळ्या टिंगलटवाळी करतात आणि मुख्यमंत्र्यांचे पोलीस बघ्याची भूमिका घेतात.यावरून हे सरकार किती नालायक व निर्दयी आहे,हेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात स्वारगेट व छेडछाड,या दोन प्रकरणी सरकारवर तुटून पडायला हवं.

