दिपक मोहिते
” नियतीच श्रेष्ठ,”
अवैधरित्या पैसा कमावणाऱ्याची गत अशीच होत असते,
वसई तालुक्यातील जमिनी लुटणाऱ्या व बांधकाम व्यवसायातुन पैसा कमवून गडगंज श्रीमंत झालेल्या राकेश वाधवान यांच्यासाठी पायघड्या घालणारे आता त्याच्या ओस पडलेल्या प्रसादाकडे फिरकेनासे झाले आहेत.केवळ वाधवानच नाही तर त्यांच्या मुलांनाही जेलची हवा खावी लागली.एकेकाळी आलिशान गाडीतून फिरणारा इतराना कर्जपुरवठा करणारा सफेदपोश माणूस सध्या हलाखीचे आयुष्य जगत आहे.नियती कोणाला सोडत नाही,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सहाराचे सर्वेसर्वा सूब्रत रॉय याचीही अशीच अवस्था झाली होती.त्याचा शेवट कसा झाला हे सर्वश्रुत आहे.नियती कधीच कोणाला सोडत नाही.गोरगरिबांची अशा लोकांना हाय लागते. इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला अशी असंख्य उदाहरणे पाहायला मिळतील.
या राकेश वाधवान यांचे पिताश्री इंग्रजांच्या काळात दिवाण होते,त्यावेळी त्यांनी जमिनी कशा आपल्या नावावर केल्या,तो एक वेगळा इतिहास आहे.वसईतील अनेक भूमीपुत्रांच्या जमिनी कशा बळकावण्यात आल्या,त्यावर आपण थोड्याच दिवसात प्रकाशझोत टाकणार आहोत.त्यानंतर त्यांच्या या दिवट्या पोराला राजाश्रय मिळत गेला.अनेक राजकीय नेतेही त्यांच्यासमोर लोटांगण घालण्यात धन्यता मानत असत. त्यामुळे त्याचे कार्यक्षेत्र सतत विस्तारीत गेले.रग्गड पैसा आला व हिंमत वाढत गेली.जमिनी नंतर त्याची नजर बँकावर पडली.पीएममसी बँकेचे ४ हजार ३३५ कोटीचा त्याने घोटाळा केला.याप्रकरणी १० जणावर गुन्हे दाखल झाले तर त्याच्या एचडीआयएल कंपनीच्या दोन संचालकासह याला त्याला अटक झाली.याप्रकरणी हजारो खातेदार संकटात सापडले.या इसमाकडून झालेल्या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन सरकारी तपास यंत्रणा त्याच्या मागे हात धुवून लागल्या.त्याला व त्याच्या सर्व साथीदारांना जेलची हवा खावी लागली.वसईमधील एफएसआय घोटाळा प्रकरणातही याचा सहभाग आहे.गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणातही तो एक आरोपी असून तेही प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.असे एक ना अनेक आर्थिक घोटाळे करणारा व एकेकाळी बडा उद्योजक म्हणून उजळ माथ्याने फिरणाऱ्या या इसमाचा प्रासाद आता ओस पडला आहे.ऐन सुगीच्या काळात जे त्याच्यासमोर साक्षात लोटांगण घालत होते,ते गायब झाले. आज त्याची सध्याची स्थिती अतिशय दयनीय अशी झाली आहे.आधार घेतल्याशिवाय त्याला चालता येत नाही.ऐन कोरोनाच्या काळातही त्याने पैश्याच्या जोरावर तत्कालीन विशेष प्रधान गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्याकडून प्रवासाची मुभा देणारे पत्र मिळवले व हे महाशय आपल्या पाच आलिशान गाड्यामधून महाबळेश्वर येथील आपल्या आलिशान प्रसादात दाखल झाले होते.मात्र माध्यमानी टीकेची झोड उठवल्यानंतर त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात करण्यात आली.यावरून हा इसम आपल्या पैश्याच्या जोरावर अधिकाऱ्यांना कसा खिश्यात घालत होता,हे स्पष्ट झाले होते.
काही वर्षांपूर्वी एका मिलच्या मालकाची मुंबईत हत्या झाली होती.तो गॅंगस्टर लोकांच्या नादी लागून त्यांच्या गैरधंद्यात सक्रिय झाला होता. आयुष्यभर कोट्यवधी मीटर कपड्याचे उत्पादन घेणाऱ्या या उद्योगपतीचा मृतदेह रस्त्यावर असलेल्या सिग्नल शेजारी कित्येक तास पडून होता.आयुष्यभर कोट्यवधी मीटर कपड्याचे उत्पन्न घेणाऱ्या उद्योगपतीच्या मृतदेहावर टाकण्यासाठी साडेतीन मीटरचा सफेद कपडा टाकायला कोणी तयार नव्हता.या घटनेवरून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी.आयुष्यात पैसा हा महत्वाचा आहे,तो जरूर कमवा,पण तो वैध मार्गाने.अवैध मार्गाने कमावलेला पैसा तुम्हाला शांतपणे झोपू देत नाही.एकवेळ अशी येते की तेंव्हा होत्याचे नव्हते होते.आज या वाधवान याचे हेच झाले आहे.गरजेपेक्षा जास्त पैसा कमवणे व तोही अवैधरित्या,तो केवळ पापाच खरेदी करतो.वाधवान हे त्याचे ज्वलंत उदाहरण होय.

