दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शिंदे व फडणवीस यांच्यामध्ये शह – काटशहाचे राजकारण सुरु,
पालघर जिल्ह्याचे पाललमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुसक्या बांधण्यासाठी सध्या कंबर कसली आहे.त्यांनी ठाण्यात घेतलेल्या जनता दरबाराला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,तो पाहून एकनाथ शिंदे सावध झाले व त्यांनी आपले विश्वासू सहकारी व ठाण्याचे खा.नरेश म्हस्के यांना मैदानात उतरवले आहे.
या खा.मस्के यांनी गणेश नाईक यांच्या नवी मुंबई या बालेकिल्यात जाऊन ” खासदार आपल्या दारी,” हा गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला छेद देणारा उपक्रम यशस्वीपणे राबवला.विशेष म्हणजे खा.म्हस्के यांच्या उपक्रमालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट व भाजपमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे.एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांनी गेल्या महिनाभरात एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाना सरसकट स्थगिती देऊन टाकली.त्यामुळे शिंदे यांना आपली नाराजी लपवता आली नाही.त्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ” या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका,” अशी गर्भित धमकीच देऊन टाकली.त्यानंतर त्यांनी खा. नरेश म्हस्के यांना नवी मुंबई येथे ” खासदार आपल्या दारी,” हा उपक्रम हाती घ्यायला लावला.आता त्यांच्याच गटाचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर येथे जनता दरबार घेण्याचे जाहीर केले आहे.हे जे शह – काटशहाचे राजकारण सुरु झालंय,ते भविष्यात महायुती सरकारला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

