दीपक मोहिते,
” संपादकीय,”
बलाढ्य भाजपला दक्षिणात्य राज्यात गेल्या दहा वर्षात पाय रोवता आले नाहीत,
भाजप,आजच्या घडीला देशात बलाढ्य पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी पक्षात सर्वत्र आलबेल आहे,अशी स्थिती नाही.अनेक राज्यात भाजपला इतर प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घेल्याशिवाय निवडणुका लढवता येत नाही.दाक्षिणात्य राज्यात आजही त्यांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे.केरळ,तामिळनाडू राज्यात त्यांची पाटी कायम कोरीच राहीली तर आंध्रप्रदेशमध्ये चन्द्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशमचा टेकू घ्यावा लागला.तेलंगणा व कर्नाटक,या दक्षिणेतील दोन महत्वाच्या राज्यात त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून धडपड सुरू आहे.पण यश त्यांना हुलकावणी देत आहे.हिमाचल प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या पाठीला माती लावली.बिहार राज्यात त्यांना त्यांचे मित्र नितीश कुमार त्यांना सतत बोटावर नाचवत आहेत.प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांची डाळ शिजू देत नाही.झारखंड राज्यात सोरेन कुटुंबीय आपापसात कितीही भांडत असले तरी राज्याची सत्ता भाजपच्या हाती जाऊ देतील,असे वाटत नाही.पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नाकात वेसण घातली.जम्मू-काश्मीरमध्ये फारुख शेख यांनी कमबॅक केल्यामुळे भाजपला या राज्यात तोंडावर आपटावे लागले.मध्य,पश्चिम व उत्तर भारतात मात्र भाजपने गेल्या काही वर्षात चांगलेच बस्तान बसवले आहे.मध्यप्रदेश,छत्तीसगड,
उत्तराखंड,गोवा,दिल्ली राजस्थान,गुजरात,आसाम व उत्तर प्रदेश,या राज्यात आपला झेंडा फडकवत ठेवला आहे.या नऊ राज्यात विरोधी पक्षाना त्यांनी चांगलेच जखडून ठेवले आहे.ओरिसा राज्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनेक वर्षे आपला मित्र असलेल्या नवीन पटनायक यांच्या पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड देत सत्ता हिसकावून घेतली.महाराष्ट्रात त्यांना आजवर स्वबळावर निवडणुका जिंकणे कधीच शक्य झाले नाही.१९९५ साली सेनेशी युती करत त्यांनी सत्ता स्थापन केली.त्यानंतर २०१४ सालीही त्यांनी सेनेशी घरोबा केला.पण २०१९ साली मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून त्यांचा सेनेशी काडीमोड झाला.हाती आलेली संधी पाहून उध्दव ठाकरे व शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करत त्यांना ठेंगा दाखवला.मात्र त्यानंतर त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला फोडणी देत,महायुतीच्या माध्यमातून सरकार स्थापन केले.सध्या महाराष्ट्रात त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरु केली आहे.त्यांचा हा प्रयत्न कितपत शक्य होईल,हे सांगणे जरा कठीणच आहे.उत्तर व ईशान्य भागातील सिक्कीम, मेघालय,मणिपूर,मिझोरम, नागालँड,अरुणाचल प्रदेश व त्रिपुरा,या सात छोट्या राज्यातही भाजपची परिस्थिती फारशी चांगली नाही.
महाराष्ट्रात कधीही काहीही घडू शकते,अशी स्थिती आहे.दोन दिवसापूर्वी नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका जाहीर सभेत बोलताना फडणवीस व अजित पवार यांच्या समक्ष ” या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका, ” असा वैधानिक इशारा देऊन मोकळे झाले. त्यांचा हा वैधानिक इशारा प्रत्यक्षात कोणाला होता ? याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही.सरकारमध्ये असूनही एकनाथ शिंदे यांची प्रत्येक आघाडीवर भाजपकडून कोंडी करण्यात येत असल्यामुळे शिंदे सध्या बॅकफुटवर गेले आहेत. त्यामुळे भविष्यात काहीही घडू शकते.सध्या एकनाथ शिंदे शांत असल्याचे पहायला मिळत असले तरी ते अधून मधून दिल्लीला जाऊन रात्री अपरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराची कडी वाजवत असतात.

