दीपक मोहिते,
राज्याचे तापमान चढत्या कमानीवर : अनेक शहरे तापली,
गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड तापमान आणि दमटपणा वाढत आहे.मुंबईसह कोकणातील राज्यातील अनेक शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबई,पालघर, ठाणे,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.फेब्रु. महिन्यातच या सर्व शहरांचे तापमान ३८ अंश सेल्सियसवर गेले आहे. नागरिक उन्हाच्या कडाक्याने हैराण झाले आहेत.आज राज्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली.मराठवाडा विदर्भात आज दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य झाले होते.उत्तर महाराष्ट्रातही सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान येत्या तीन दिवसात राज्यातील अंतर्गत भागात २ ते ३ अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकण व गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात येत्या २४ तासांत तापमान वाढण्याची शक्यता आहे.कोकण,गोवा व मुंबई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. आज ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ” यलो अलर्ट,” देण्यात आला होता.पुढील दोन दिवस तापमानाची स्थिती कायम राहणार आहे.राज्याच्या उर्वरित भागात सध्या कोरडे व शुष्क हवामान असून तापमानात सतत वाढ होत आहे.
राज्यात पुणे आणि कोल्हापूर विभागात कोरडे हवामान होते. राज्यात काल सरासरी ३४ अंश सेल्शियस तापमान होते. मार्च,एप्रिल,मे व जून या चार महिन्यात राज्यातील नागरिकांना उष्म्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.

