दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गृहविभाग संभाळण्यास देवाभाऊ अपयशी…
महायुतीच्या साडेतीन वर्षाच्या काळात राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पूर्णतः ढासळली आहे.दिवसागणिक होणारे बलात्कार,हत्या,लूटमार,
विनयभंग,कोयता गॅंगचा हैदोस,हिट अँड रन,अपहरण इ.घटनांनी महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पार काळावंडला गेला आहे.या परिस्थितीला राज्याचा गृहविभाग सर्वस्वी जबाबदार आहे.२०१४ ते २०१९ दरम्यान यशस्वी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या अडीच वर्षातील बेभरवसा कारभार जबाबदार आहे.वास्तविक राज्यात गुन्हेगारीचा आलेख सतत वर जात असताना फडणवीस यांनी गृहखाते सांभाळण्यास आपण असमर्थ ठरलो,हे कबूल करून हा महत्वाचा तसेच संवेदनशील विभाग मंत्रिमंडळातील एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवणे आवश्यक ठरते.पण देवेंद्र फडणवीस यांचा जीव,या विभागात कायम अडकल्याचे दिसून आले आहे.
बदलापूर बलात्कार प्रकरणात जे काही घडले,ते राज्याला लांच्छनास्पद होते.या प्रकरणाने गृहविभागाची लक्तरेच वेशीला टांगली गेली.त्यानंतर संतोष देशमुख,मुंडे यांच्या झालेल्या निर्घृण हत्या,बदलापूर प्रकरणातील आरोपीचे पोलिसांकडून झालेले फेक एन्काऊंटर,आणि आता स्वारगेट एसटी आगारात एका महिलेवर झालेला बलात्कार,इ.लांच्छनास्पद घटनांनी देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द झाकोळली गेली आहे.स्वारगेट आगारात झालेल्या बलात्कार प्रकरणाची दखल केंद्र सरकारने घेतली असून केंद्रिय महिला आयोगाच्या अध्यक्षांना पुण्यात दाखल व्हावे लागले.त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे स्पष्ट होत आहे.आज या राज्यात कोणीही सुरक्षित नाही.पुण्यासारखे शहर जे कधी काळी ” एक अमन का शहर,” म्हणून ओळखले जायचे,ते शहर आता बदनाम झाले आहे.दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका गुंडाने थेट हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला चांगलेच कानफटवले.त्यामुळे मोहोळ यांचा प्रचंड संताप झाला व त्यांनी पोलिसांना वारंवार सूचना देऊनही गुंडावर कारवाई होत नाही,हे मान्य करण्यासारखे नाही,असे स्पष्ट मत व्यक्त केले.मारहाण करणाऱ्या या गुंडांनी अंधभक्ताच्या देवाभाऊना ” घरचा आहेर,” दिल्याची खमंग चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे.त्यामुळे देवाभाऊनी आता नैतिक जबाबदारी स्विकारून आपल्या अंगावरील गृहविभागाची वल्कले खाली उतरवून ठेवायला हवीत.

