दीपक मोहिते,
प्रतिक्षा संपणार का ?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सूनावणीकडे सर्वांचे लक्ष,
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सोक्ष मोक्ष लागण्याची शक्यता आहे.गेल्या साडेचार वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.त्यामुळे आज होणाऱ्या सूनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आरक्षण व प्रभाग रचना, अशा दोन कारणावरून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गेल्या साडेचार वारंवार पुढे ढकलल्या गेल्या.राज्यशासनाने या काळात महानगरपालिका,महापालिका,नगरपरिषदा,नगर पंचायती,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,सहकारी बँका व संस्थावर शासनाने प्रशासक नेमले.प्रशासकीय राजवटीत या सर्व संस्थांचा कारभार नोकरशाहीच्या ताब्यात गेल्यामुळे विकासाची गती मंदावली,भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली,तसेच या काळात लोकांची कामे वेळेवर झाली नाहीत.सर्वत्र बजबजपुरी निर्माण झाली.त्यामुळे या निवडणुका लवकर व्हाव्यात,अशी जनतेकडून मागणी होत होती.प्रभाग रचनेसोबत ओबीसी आरक्षण प्रश्नी दाखल झालेल्या सर्व याचिका मागे घेण्यात आल्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नाचा तिढा सुटला नसला तरी निवडणूक प्रक्रियेतील अडथळा मात्र दूर झाला आहे.आज होणाऱ्या सुनावणीत प्रभाग रचना संदर्भात सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निर्णय घेते की पुन्हा ” तारीख पे तारीख,” अशी मालिका सुरू ठेवते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय हा तिढा सोडवेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

