दीपक मोहिते,
वाढदिवस विशेष,
राजेंद्र पाटील ; शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी,
कृषी व सहकार क्षेत्रात नावारूपाला आलेले राजेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस.दरवर्षी त्यांचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विरार पूर्वेस ग्रामीण भागातील सायवन या गावात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळते.त्यामध्ये शेतकरी,आदिवासी मजूर,राजकीय नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील मातब्बर मंडळींचा समावेश असतो.
पाटील यांचे कुटुंब हे वर्षानुवर्षे सायवन या अतिदुर्गम भागात भातशेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत.त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक आवक माफक प्रमाणात असे,पण हे कुटुंब अत्यंत समाधानी होते.कुटुंबातील एक सदस्य राजेंद्र पाटील हे लहानपणापासून उत्साही व हुरहुन्नरी असे व्यक्तिमत्व होते.केवळ आपले नातेवाईक असलेले कुटुंब आहे,असे न मानता त्यांनी सायवन गावाला आपले कुटुंब मानले होते.समाजसेवेची प्रचंड आवड होती,पण समाजकारणाला राजकारणाची जोड दिली तर परिसराचा विकास वेगाने होऊ शकेल.तसेच समाजातील सर्व घटकांना विकासाची फळे चाखता येतील,असे मनोमन ठरवून त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले.राजकीय वाटचाल सुरू झाली व त्यांच्या पाठीशी कारवा जमत गेला.एकीकडे राजकारणाची जोड तर दुसरीकडे शेतकरी सेवा संस्थाच्या माध्यमातून सहकाराकडे झेप अशी त्यांची वाटचाल होत राहिली.दरम्यान लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या सानिध्यात आले,आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली.मनमिळावू स्वभाव,सहकार्याची भावना व अविरत परिश्रम या तीन गुणाच्या जोरावर अल्पावधीत कृषी व सहकार क्षेत्राच्या क्षितिजावर चमकू लागले.बहुजन विकास आघाडीचा पूर्व भागातील एक आश्वासक चेहरा अशी त्यांची ओळख निर्माण झाली.माजी आ.हितेंद्र ठाकूर हे विरार पूर्व भागातील सर्व निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून निर्धास्त होत असत.राजेंद्र पाटील यांनीही गेल्या २५ वर्षात त्यांना नाउमेद केले नाही.प्रत्येक निवडणुकीत त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली.पंचक्रोशीत असलेला दांडगा जनसंपर्क व वेळोवेळी लोकांना केलेली मदत,या बळावर त्यांनी विरोधकांना कधीच डोकं वर काढू दिले नाही.केवळ राजकारण करून यशस्वी होता येत नाही,तर त्याला समाजकारण व सहकाराची जोड द्यावी लागते,यावर त्यांचा दृढविश्वास,त्यामुळे राजेंद्र पाटील व सायवन पंचक्रोशी हे समीकरण तयार झाले,ते आजही कायम आहे.गेली २५ वर्षात राजेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.सतत आदळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ( हवामानात होणारे बदल,अवकाळी पाऊस,अतिवृष्टी व सरंजामशाही पद्धतीने वागणारी नोकरशाही ) ते शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहिले.सरकारी विभाग,बँक व नाबार्ड सारख्या संस्थाच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.त्यामुळे वातानुकूलित कक्षात बसून कृषीविषयक धोरण आखणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील कृषिक्षेत्राचे विदारक चित्र कळू लागले.त्यामुळे जिल्ह्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला असतानाही ग्रामीण भागातील कृषी क्षेत्र आजही टिकून आहे.पीक कापणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसते,त्यामुळे त्यांनी उन्हाळी पीके कशी घेता येतील,याचा अभ्यास केला व शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कोणती कृषी उत्पन्न घेता येतील,हे शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून पटवून दिले.त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी टोमॅटो,दुधी,भेंडी,मिरची,
काकडी व वांगीची लागवड करण्यास सुरुवात केली.भातशेतीसोबत जोडधंदा सुरू करण्यात राजेंद्र पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.

