दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” पीएमटी टू मर्सिडीझ,” एक विलक्षण प्रवास,
दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ.निलम गोऱ्हे यांनी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी शब्दात टीका केल्यामुळे त्या स्वतः अडचणीत आल्याच पण आता संमेलनाचे आयोजकही टीकेचे धनी झाले आहेत.अनेक नेटकऱ्यांनी समाजमाध्यमावर डॉ.गोऱ्हे व संमेलनाचे आयोजक या दोघांवर लक्ष्य केले आहे.
या संमेलनात ” असे घडलो आम्ही,” या कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीमध्ये डॉ.गोऱ्हे यांनी ” सेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की हवं ते मिळते,” असा थेट आरोप केला.त्यांच्या या आरोपाचे अवघ्या काही तासात राज्यभरात जोरदार पडसाद उमटले.दिवसभर समाजमाध्यमावर गोऱ्हे यांच्यावर तुफान टीका होत होती.या टीकेचा आशय होता,” पीएमटी टू मर्सिडीझ,” एकेकाळी पीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या डॉ.गोऱ्हे आता मर्सिडीझ मधून कसा प्रवास करतात,भारी किमतीच्या साड्या कशा वापरतात,सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या असतात.त्यांनी एखादी जाहीर सभा घेतली का ? घणाघाती भाषणे त्यांनी कधी केली का ? केवळ मातोश्रीवर हजेरी लावत ” आयत्या बिळावर नागोबा,” होऊन त्या ” थोडे थांबावे लागेल,” असा सूर कायम आळवत राहिल्या.सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर डॉ.गोऱ्हे या कायम मातोश्रीच्या गेटवर उभ्या असायच्या,अशी जिव्हारी लागणारी टीका केली.आपल्यावर होणारी टीका काही थांबत नाही,हे पाहून डॉ गोऱ्हे यांनी आता सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्या या मुलाखातीनंतर सेनेने संमेलनाच्या आयोजकांना खरमरीत पत्र लिहिले,या पत्रात ” संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर जर राजकारणासाठी होत असेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो,” असे म्हंटले आहे.त्यामुळे आयोजकांना लगबगीने खुलासा करावा लागला.ते केवळ खुलासा करून थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.वास्तविक त्यांनी तारतम्य बाळगायला हवे होते.त्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत होते,असे सांगत स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक संमेलनाच्या कार्यक्रमात राजकारणी लोकांना आमंत्रित करणे,किंवा त्यांना स्वागताध्यक्ष करणे,या गोष्टींना अनेक दिग्गज साहित्यिकांचा विरोध आहे.पण संमेलनाच्या आयोजनाचा आर्थिक भार राज्य सरकार व हे नेतेमंडळी उचलत असल्यामुळे गेल्या काही वर्षात संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते.काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिका स्व.दुर्गा भागवत यांनी यावर सडकून टीका केली होती.या राजकीय लोकांना आपले व्यासपीठ वापरू देऊ नका,अशा भाषेत त्यांनी आयोजकांना खडे बोल सुनावले होते.परंतु पैश्याच्या लाचारीमुळे आयोजकांनी आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला.आज त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.या संमेलनात झालेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमाची चर्चा होण्याऐवजी ” पीएमटी टू मर्सिडीझ,” या अशा खमंग विषयावर सर्वदूर चर्चा होत आहे.

