दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडल्यामुळे महायुतीचे अनेक मंत्री भितीच्या सावटाखाली,
थोर समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.गेले एक दशक मौन बाळगून असलेले हजारे अचानक राजकीय भाष्य करू लागल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दोनच दिवसापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यास त्यानी आपली नैतिक जबाबदारी म्हणून सर्वप्रथम आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणी केली आहे.तसेच ज्या आमदारांवर आरोप आहेत,अशा लोकांना मंत्रिमंडळात घेताना विचार केला पाहिजे.त्यासाठी निकष ठरवण्याची गरज आहे.यावेळी अण्णा हजारे यांनी वादग्रस्त मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.
धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे,हे दोन मंत्री भ्रष्टाचार प्रकरणी वादग्रस्त ठरले असताना अण्णा हजारे यांनी पुन्हा उचल खाल्यामुळे राजकीय मंडळी त्यांच्या या वक्तव्याकडे सावधपणे बघत आहेत.यापूर्वी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री शशिकांत सुतार,महादेव शिवणकर,शोभा फडणवीस व बबनराव घोलप,या मंत्र्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते.त्यानंतर त्यांनी दिल्लीत केलेल्या प्रदीर्घ आंदोलनामुळे केंद्र व दिल्लीतील काँग्रेस सरकारला सत्ता गमवावी लागली होती.अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाला भाजप व अरविंद केजरीवाल यांची फूस होती.अण्णांच्या या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता.देशभरात काँग्रेसच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती.त्यानंतर भाजप व अरविंद केजरीवाल या दोघांना सुगीचे दिवस आले होते.केंद्रात भाजप व दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सत्तेत येणे सहजशक्य झाले होते.या सर्व घडामोडीमुळे उद्दीग्न झालेल्या अण्णा हजारे यांनी राजकीय लोकांच्या नादी लागणे सोडून दिले.या काळात ते आपल्या राळेगणसिद्धी या आपल्या गावी निवांत जीवन जगू लागले.ते सार्वजनिक जीवनात अभावाने दिसू लागले.त्यांची बदललेली ही जीवनशैलीही त्यांना त्रासदायक ठरली,त्यांच्यावर सतत आरोप होत होते.त्यांनी स्विकारलेले मौन,हे भाजपला फायदेशीर ठरणारे असून सेना-भाजप युती सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे घडल्यानंतरही अण्णांनी आपले मौन सोडले नव्हते.त्यामुळे त्यांच्या अशा वागण्याबाबत संशयाचे धुके निर्माण झाले.आता अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडल्यामुळे त्यांना सक्रिय करण्यामागे कोणत्या शक्ती आहेत,याचा मागोवा घेण्यात येत आहे.

