दीपक मोहिते,
” घरचा आहेर,”
एसटी जमिनविक्री ; ” रोगापेक्षा उपचार भयानक,” असे होता कामा नये,
लाडक्या बहिणींना व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात आल्याची प्रांजळ कबुली परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिली.यावेळी त्यांनी अशा आकर्षक योजनांमुळे एसटीला दरदिवशी ३ कोटी रु.चा तोटा होत असल्याचे सांगितले.यावरून महायुती सरकार हे सत्तेच्या हव्यासापोटी राज्याला कसे आर्थिक खाईत ढकलत आहे,हे स्पष्ट होत आहे.
गद्दारी करून सत्तेत आलेले आपले सरकार टिकले पाहिजे,यासाठी
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या,आल्या सवंग लोकप्रियतेच्या योजना लागू केल्या.या योजना लागू करताना राज्याची आर्थिक स्थिती ढासळेल,याची तमा न बाळगता सवंग लोकप्रियतेच्या योजना लागू केल्या.त्यामुळे एसटी महामंडळाची अवस्था अत्यंत भयावह अशी झाली आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी तिजोरीत पैसा शिल्लक राहिला नाही.कामगारांचे वेतन गेल्या तीन वर्षात कधीच वेळेवर झाले नाही,ते सतत रखडत गेले.महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत देणे,या योजनेमुळे एसटी खड्ड्यात गेली.दररोज ३ कोटी रु.चा चुना महामंडळाला लागत आहे.यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बिल्डर डोक्यातुन एक सुपीक योजना आता बाहेर आली आहे.हा तोटा भरून काढण्यासाठी सरनाईक आता महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या हजारो हेक्टर जमिनी विकू पाहत आहेत.प्रताप सरनाईक हे व्यवसायाने बिल्डर आहेत.त्यांची नजर या अशा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीवर जाणे,हे साहजिकच आहे.पण हा व्यवहार आतबट्ट्याचा ठरणारा आहे.या जमीन विक्रीतून येणाऱ्या पैश्यातून सरनाईक हे महामंडळाचा तोटा भरून काढणार आहेत.अशा व्यवहारात एसटी महामंडळाचे भले होणार नाही,तर धनदांडगे मात्र या जमिनीचे लचके तोडणार आहेत.या आतबट्ट्याच्या व्यवहारात एसटीचा मात्र कपाळमोक्ष होणार आहे.सरकारने जमिनविक्री करून एसटीचा तोटा भरून काढण्याच्या उद्देशामागे काय इंगित आहे,यामध्ये कोणाचे उखळ पांढरे होणार आहे,हे लक्षात घेऊन त्यांनी महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत देणाऱ्या योजनेचा फेरविचार करायला हवा.अन्यथा जमिनविक्री हा उपाय म्हणजे ” रोगापेक्षा उपचार भयानक,” असे होईल.

